28 January 2020

News Flash

नड्डा हेच भाजपचे नवे अध्यक्ष?

नवी दिल्ली: भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हेच पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असतील.

२० जानेवारी रोजी निवडणुकीनंतर अधिकृत घोषणा

नवी दिल्ली: भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हेच पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. सध्या भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुका होता असून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी २० जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. विद्य्मान अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नि:संशय पाठिंबा असल्याने नड्डा यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या मुख्यालयात मंगळवारी अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेतील सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेची अधिकृत घोषणा १७ जानेवारी रोजी केली जाणार असून १९ जानेवारी ही अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. २० तारखेला दुपारी तीनच्या सुमारास भाजपच्या नव्या अध्यक्षांची घोषणा केली जाईल.

लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळवून देऊन सर्वाधिक यशस्वी अध्यक्ष असे बिरूद मिळवणारे अमित शहा मोदी यांच्या नव्या सरकारमध्ये  गृहमंत्री बनल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे दिली जात आहे. ‘एक व्यक्ती एक पद’ हा नियम भाजपमध्ये काटेकोरपणे पाळला जात असल्याने नवा राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती होणार आहे. मात्र, भाजपच्या पक्ष संघटनेवर पकड मात्र मोदी-शहा यांचीच राहणार असल्याचे पक्षांतर्गत स्तरावर अप्रत्यक्षपणे मान्य करण्यात आले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया तुलनेत क्लिष्ट असून किमान ५० टक्के प्रदेशाध्यक्षांनी अध्यक्षपदाच्या उमेदवाराला संमती द्यवी लागते. अजून प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू असून ती १७ जानेवारी पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात निश्चित करण्यात आली आहे. पक्षांतर्गत निवडणुका पूर्ण होण्यात दिरंगाई झाली आहे.

प्रदेश स्तरावरील निवडणुका ३० नोव्हेंबर तर केंद्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका ३० डिसेंबरपर्यंत संपणे अपेक्षित होते व ३१ डिसेंबर रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा केली जाणार होती. मात्र, हरियाणातील सरकार बनवण्यास लागलेला विलंब, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि त्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून निर्माण झालेला वाद या कारणांमुळे प्रक्रिया लांबली असल्याचे सांगितले जाते.

पहिले आव्हान ‘दिल्ली’चे!

दिल्ली विधानसभेची निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी होत असून नड्डा यांच्यासमोर तेच पहिले आव्हान असेल. हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या तीनही निवडणुका शहा यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या. दिल्ली निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडीसंदर्भात रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस शहा यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. १६ जानेवारी रोजी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून त्याच दिवशी उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

First Published on January 15, 2020 1:54 am

Web Title: nadda is the new bjp president akp 94
Next Stories
1 दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी‘आप’ उमेदवारांची यादी जाहीर
2 आरोपींना फाशीच!
3 ‘जामिया’ प्रकरणात मानवी हक्क आयोग सक्रीय
Just Now!
X