स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या विरोधात नागालँडमध्ये तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावाने कोहिमामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केली असून कोहिमा नगरपरिषदेची इमारतही जमावाने पेटवून दिली. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती नागालँडच्या पोलीस महासंचालकांनी दिली आहे.

नागालँडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याविरोधात आंदोलन सुरु आहे. या आरक्षणाविरोधात नागालँड ट्राईब अॅक्शन कमिटीने गुरुवारी नागालँडचे मुख्यमंत्री टी आर जेलिआंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावी अशी मागणी केली होती. गुरुवारी संध्याकाळी चारपर्यंत राजीनामा देण्याचे अल्टीमेटम त्यांना देण्यात आले होते. तसेच पोलीस आयुक्तांची बदली आणि निवडणूक प्रक्रीया अवैध ठरवण्याची या संघटनेची मागणी होती. मात्र यानंतरही निवडणूक प्रक्रीया राबवली जात असल्याने गुरुवारी संध्याकाळी परिस्थिती बिघडली.

रात्री संतप्त जमावाने कोहीमा नगरपरिषदेची इमारत पेटवून दिली. परिस्थिती चिघळत असल्याचे बघून केंद्रीय गृहमंत्रालयाने निमलष्करी दलाची तुकडी तैनात केली आहे. सध्या राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोहिमामध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.