आसामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्याची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीतून भारताच्या पाचवे राष्ट्रपतींच्या कुटुंबातील व्यक्तींचीच नावे गायब आहेत.

आसाममध्ये बांगलादेशातून होत असलेल्या घुसखोरीवर उपाय काढण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कार्यक्रम राबवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानंतर आसामध्ये एनआरसी अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली. एनआरसीच्या अंतिम यादीतून १९ लाख लोकांना वगळण्यात आले आहे. या यादीमधून भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या कुटुंबातील चार व्यक्तीची नावेच गायब आहेत. याबद्दल बोलताना फक्रुद्दीन अली अहमद यांचे पुतणे एस ए अहमद म्हणाले, एनआरसीच्या अंतिम यादीत कुटुंबातील चार व्यक्तीची नावेच नाहीत. सात सप्टेंबरनंतर आम्ही प्रशासनाकडे जाणार आहोत. त्यानंतर यादीत नावांचा समावेश करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही एनआरसी मसुदा गेल्या वर्षी ३० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता त्यामधून ४०.७ लाख लोकांची नावे वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. एकूण ३.२९ कोटी अर्जदारांपैकी २.९ कोटी लोकांचाच समावेश करण्यात आला होता. दरम्यान, एनआरसीच्या अंतिम यादीत एखाद्याचे नाव नसले याचा अर्थ तो परदेशी नागरिक आहे असा नव्हे, कारण त्याबाबतचा निर्णय योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतर परकीय नागरिक लवाद घेऊ शकतो. त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी सरकार आहे. ज्यांचे नाव अंतिम यादीत नसेल त्यांना ते भारतीय नागरिक आहेत हे सिद्ध करण्याची पुरेशी संधी दिली जाईल, असे आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आधीच स्पष्ट केले आहे.