अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल यांच्या राजीनाम्यामागे भारत-अमेरिका संबंधांची फेरजुळणी किंवा त्यात काही आमूलाग्र बदल करण्याचा हेतू नाही, या बातमीमागे मोठे काहीही घडलेले नाही असे स्पष्टीकरण अमेरिकेने केले आहे.
परराष्ट्र खात्याच्या प्रवक्तया मारी हार्फ यांना पॉवेल यांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, की सदतीस वर्षांच्या सेवेनंतर नॅन्सी पॉवेल या निवृत्त होत आहेत व मे अखेरीस त्यांच्या डेलावेर या मूळ गावी परत येत आहेत. त्यांनी आताच राजीनामा का दिला असावा याबाबत जी माहिती दिली जात आहे त्या अफवा आहेत, त्यांच्या राजीनाम्याचा कारणांबाबत आपल्याला माहिती नाही पण त्याचा संबंध दोन्ही देशातील संबंधांशी नाही, त्यामुळे भारत-अमेरिका यांच्यातील संबंधात फेरजुळणी होण्याची किंवा मोठे बदल होण्याचे संकेत दिले जात असले तरी त्यात तथ्य नाही. अलिकडच्या काही घटनांचा त्यांच्या राजीनाम्याशी
काही संबंध नाही, त्यांच्या राजीनाम्यामागे कुठलीही मोठी घटना नाही.
भारतातील निवडणुकीच्या सात दिवस अगोदर पॉवेल यांनी राजीनामा देण्यामागे दोन्ही देशातील संबंधांची फेरजुळणी किंवा काही महत्त्वाचे बदल हे कारण आहे काय असे विचारले असता त्यांनी तशी शक्यता फेटाळली, त्यांनी ज्या वेळी राजीनामा दिला तो योगायोग आहे. पॉवेल (वय ६६) यांनी काल अचानक भारताच्या राजदूत म्हणून राजीनामा दिला.
मारी हार्फ यांनी सांगितले, की ३७ वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्या निवृत्त होणारच होत्या पण त्यांच्या या पूर्वनियोजित निवृत्तीमागे काही कारणे असल्याची शक्यता आपल्याला वाटत नाही. त्यांच्या जागी कुणाला पाठवायचे याबाबत निर्णय झालेला नाही. जो कुणी पुढील राजदूत भारतात जाईल त्यांच्या काळातही दोन्ही देशातील भागीदारी टिकून राहील यात शंका नाही.