नंदादेवी शिखर परिसरात जोरदार वारे

उत्तराखंडमध्ये पिठोरगड जिल्ह्य़ात नंदादेवी पूर्व शिखर सर करण्यासाठी गेलेल्या गिर्यारोहकांपैकी मरण पावलेल्या पाचजणांचे मृतदेह खाली आणण्यात खराब हवामानामुळे अडचणी येत आहेत. बुधवारी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी तेथे तीन फेऱ्या मारल्या पण जोरदार वाऱ्यांमुळे मृतदेह खाली आणणे अशक्य बनले आहे. हा प्रदेश अतिशय कठीण असून मृतदेह आणण्यास एक आठवडाही लागू शकतो असे पिठोरगडचे जिल्हा दंडाधिकारी व्ही. के. जोगदंडे यांनी सांगितले.

हेलिकॉप्टर्सच्या तीन फेऱ्या झाल्या असून ही हेलिकॉप्टर्स तेथे उतरू शकलेली नाहीत, पण पाच मृतदेह कुठे आहेत ते समजले आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने हेलिकॉप्टर्स उतरण्यात अडचणी येत असून इंडो तिबेट पोलीस दलाचे जवान या हेलिकॉप्टर्समध्ये आहेत. रस्तामार्गे या ठिकाणी पोहोचून मृतदेह गोळा करण्याचा प्रयत्न उद्या केला जाणार आहे. आपत्ती प्रतिसाद दलाचे ३५ जवान आज रात्री दोन गटात तेथे जाणार आहेत. एक गट हवाई मार्गे तर एक रस्ता मार्गे जाईल.  या भागात सतत हिमवृष्टी चालू असून मदतकार्य अवघड आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सला आठ पैकी पाचजणांचे मृतदेह दिसले आहेत. नंदादेवी शिखराकडे जाणाऱ्या मोहिमेत ते सर्वजण बेपत्ता झाले होते. या मोहिमेत ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलियाचे गिर्यारोहक होते पण त्यांच्यापैकी काहीजण हिमकडे कोसळून ठार झाले. ब्रिटनच्या चार गिर्यारोहकांची यात सुटका करण्यात आली आहे. ब्रिटन, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचे एकूण सातजण या मोहिमेत होते. दिल्लीच्या इंडियन माउंटेनिरिंग फाउंडेशनचा एक अधिकारीही  त्यांच्यासोबत होता. १३ मे रोजी हे सर्व जण मुन्सीयारी येथून गेले होते.  २५ मे रोजी ते परत येणे अपेक्षित होते. मोहिमेतील गिर्यारोहकांचे नेतृत्व ब्रिटिश गिर्यारोहक मार्टिन मोरान करीत होते.