बहुजन समाजात भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे घट्ट करून महायुतीच्या माध्यमातून नव्या जातीय समीकरणाला आकार देणारे गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेस नेते नारायण राणे यांना भाजपसाठी दारे बंद झाली आहेत. लोकसभा निवडणुकीत मुलगा नितेश यांच्या दारुण पराभवामुळे अस्वस्थ झालेल्या राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची तयारी दर्शवत भाजप प्रवेशासाठी मुंडे यांचे दार ठोठावले होते. मुंडे यांनी त्यांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते, मात्र ‘भेटून बोलू’ असे सांगत त्यांच्या आशा उंचावल्या होत्या.
राणे यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यास शिवसेनेशी असलेले संबंध ताणले जातील, अशी प्रदेश स्तरावरील भाजप नेत्यांची भावना आहे. मुंडे यांच्याही मनात ती भीती होतीच. तसेच निवडणुकीत मनसेची मदत घेतल्यानेही शिवसेना नेते मुंडे यांच्यावर नाराज होते. आता मुंडे यांच्या निधनामुळे राजकीय अनुभवाच्या तुलनेत कनिष्ठ असलेल्या प्रदेश स्तरावरील नेत्यांशी पटणे शक्य नसल्याने राणेंचा भाजपप्रवेश अशक्यच झाला आहे. राणे यांना मोठे पद हवे होते. शिवाय त्यांना मुख्यमंत्री होण्याचीही अतीव इच्छा आहे. त्यांना भाजपमध्ये घेतल्यास फारसा लाभ होणार नसल्याचा मतप्रवाह पक्षात प्रबळ आहे. अशा परिस्थितीत आता तर मुंडे यांचे अकाली निधन झाल्याने राणे यांचा भाजप प्रवेशाचा ‘राजमार्ग’ बंद झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सहकार्य न केल्याने नितेश यांचा पराभव झाला, असा आरोप राणे यांनी केला होता. मागील आठवडय़ात राणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटवून स्वत:ला मुख्यमंत्री करण्याची विनंती करण्यासाठी दिल्लीत आले होते, मात्र पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना आल्या पावली परत पाठवले. त्याचदरम्यान राणे यांनी मुंडे यांच्याशी संपर्क साधला होता.