भारतातली आघाडीची  आयटी कंपनीचे ‘इन्फोसिस’ चे संस्थापक नारायण मूर्ती आणि इन्फोसिसच्या संचालक मंडळामधले मतभेद पुन्हा एकजा जाहीरपण समोर आले आहे. ‘इन्फोसिस’ने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घसघशीत पगारवाढ दिली आहे. अनेक बाबतीत ती ३० ते ६० टक्के एवढ्या प्रचंड प्रमाणात पगारवाढ देण्यात आली आहे. इन्फोसिसचे माजी चेअरमन आणि संस्थापक नारायण मूर्ती यांनी प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या त्यांच्या एकत निवेदनात याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य कर्मचाऱ्यांना ६ ते टक्के पगार मिळत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र भरभक्कम रक्कम त्यांच्या खिशात टाकावी हे योग्य नसल्याचं नारायण मूर्ती यांनी स्पष्ट केलं आहे.

इन्फोसिसचे संस्थापक आणि माजी चेअरमन नारायण मूर्ती यांनी स्वत:च्या निर्णयाने निवृत्ती स्वीकारली होती. पण त्यानंतर इन्फोसिसचा गाडा काही सुरळीतपणे चालू शकला नव्हता. अनेक बाबींवर त्यांचे आणि त्यांच्या संचालक मंडळाचे खटके उडत होते. यातल्या अनेक मतभेदांची जाहीरपणे चर्चाही होत होती. यामुळे इन्फोसिसच्या प्रतिमेवर मोठा परिणाम होत असल्याने अशा बाबींची चर्चा जाहीरपणे केली जाणार नाही असं इन्फोसिसच्या वतीने सांगण्यात आलं होतं. पण मूर्तींनी प्रसारमाध्यमांकडे पाठवलेल्या या निवेदनामुळे तसंच त्यांच्या आणि इन्फोसिसच्या आताच्या संचालक मंडळामध्ये उडत असणाऱ्या खटक्यांमुळे हे मतभेद आणखी तीव्रपणे समोर येत आहेत.

एखाद्या कंपनीच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारामधली तफावत एका विशिष्ट प्रमाणातच असावी असं नारायण मूर्तींचं मत आहे. सध्या इन्फोसिसमध्ये हे पाळलं जात नसल्याचं सुचवत त्यांनी कंपनीच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच कंपनीचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर यू बी राव यांना घसघशीत पगार वाढ दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.