कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले मौन सोडले आहे. महिलांविरोधात जे गुन्हे करणार त्यांना अजिबात सोडणार नाही. अशा घटनांना चांगल्या नागरी समाजामध्ये स्थान मिळू शकत नाही. देश, समाज म्हणून आज आपल्या सर्वांना अशा घटनांची लाज वाटते. मी देशाला आश्वासत करतो कुठल्याही गुन्हेगाराला सोडणार नाही. न्याय होणारच, आमच्या मुलींना न्याय मिळणारच असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

बलात्कार आणि अत्याचार मुक्त समाजासाठी देशातील लोकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. याबदलाची सुरुवात कुटुंबापासून होते. त्यासाठी मुलांमध्ये सामाजिक मुल्ये रुजवावी लागतील. जेव्हा मुली रात्री उशिरा घरी येतात तेव्हा आपण त्यांना तुम्ही कुठे होता म्हणून विचारतो. पण जेव्हा मुले घरी रात्री उशिरा येतात तेव्हा त्यांना सुद्धा हाच प्रश्न विचारला पाहिजे असे मोदी म्हणाले.

काश्मीरमध्ये कठुआ येथे आठवर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप आहे. या दोन्ही घटनांबद्दल संपूर्ण देशात एकच संतापाचे वातावरण असून विविध पक्षांचे नेते, सेलिब्रिटींनी निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही मोदी तुम्ही कधी बोलणार ? असा सवाल केला होता.

कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी काल रात्री राहुल गांधी यांनी इंडिया गेटवर कँडल मार्च काढला होता. त्यानंतर आज शुक्रवारी त्यांनी थेट मोदींना प्रश्न विचारले आहेत. महिला आणि लहान मुलांविरोधात हिंसाचार वाढत आहे त्याबद्दल मोदी तुम्हाला काय वाटते ? बलात्कारी आणि हत्येच्या आरोपींचा राज्य सरकार का बचाव करत आहे ? असे प्रश्न राहुल यांनी टि्वटरवरुन थेट मोदींना विचारले आहेत. मोदी तुम्ही कधी बोलणार, देश तुमच्या बोलण्याची वाट पाहत आहे असे राहुल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.