अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना सभागृहातर्फे श्रद्धांजली वाहण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी राज्यसभेत करण्यात आली. या विषयावर सर्वपक्षीय सहमती झाल्यानंतर शुक्रवारी या विषयावर अध्यक्षांकडून ठराव मांडण्यात येईल, असे राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन म्हणाले.
राज्यसभेचे कामकाज गुरुवारी सुरू झाल्यावर प्रश्नोत्तराच्या तासावेळी लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डी. पी. त्रिपाठी यांनी या विषयावर बोलण्यासाठी परवानगी मागितली. त्यावेळी संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी दाभोलकर यांच्या हत्येमुळे संपूर्ण राष्ट्र दुःखी झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आले आहेत. या हत्येचा राज्य सरकार तपास करीत आहे, असे सांगितले. शून्यकाळात या विषयावर चर्चा करण्यास सरकारची कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानेही शून्यकाळात हा विषय उपस्थित करण्याला आणि दाभोलकर यांना सभागृहातर्फे श्रद्धांजली वाहण्यास त्यांनी सहमती दर्शवली. सर्वपक्षीय सहमती झाल्यावर अन्सारी यांनी शून्यकाळात हा विषय उपस्थित करण्याला मंजुरी दिली.