भारताची तिजोरी भरण्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये घाम गाळणाऱ्या भारतीयांचा मोठा हात आहे. त्यांच्या व्यवहार आणि वागण्यामुळे भारताला नेहमी मानसन्मान मिळत आला आहे. आपल्याला येथे लघु भारताचा भास होत असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईमध्ये ५० हजार भारतीयांपुढे काढले.
मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. दुबईतील क्रिकेट स्टेडियममध्ये शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आज दुबईला आपल्या देशातून जवळपास ७०० विमाने उड्डाण करतात, मात्र भारताच्या पंतप्रधानाला इकडे यायला ३४ वर्षे लागल्याची टीका त्यांनी यावेळी केली. दुबईतील भारतीयांच्या कष्टाचा आपण आदर करतो. भारतात पाऊस पडला की येथील भारतीय नागरिक छत्री उघडून बसतो. दुबईमध्ये सर्वाधिक केरळीयन लोक आहेत. त्यांना केरळ दिनाच्या शुभेच्छा देत असल्याचे मोदी यांनी सांगितले.
दहशतवादावर बोलताना मोदी यांनी सर्वत्र दहशतवादाने थैमान घातलेले असताना अबुधाबीचा राजा मंदिरासाठी जागा देऊ करत असल्याचे सांगत या राजाला उभे राहून मानवंदना देण्याचे आवाहन मोदींनी उपस्थित भारतीयांना केले. हा आपल्या सव्वाशे कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचे सांगत दहशतवादाला थारा देणार नसल्याचे स्पष्ट केले.
भारताने नेहमी शेजारधर्म पाळला. अफगाणिस्तानला त्याच्या कठीण काळात मदत केली. मालदीवला पाणी संकटावेळी तहानलेला ठेवला नाही. लवकरच सार्क देशांतील कृषी, शिक्षण व इतर क्षेत्राला चालना देण्यासाठी उपग्रह अंतराळात पाठविण्यात येणार आहे. परदेशात जाण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. पारपत्रासाठी मदद नावाची सुविधा निर्माण करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.

५ लाख कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता
अबुधाबी/दुबई: संयुक्त अरब अमिरातीने भारतात ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे, त्यामुळे येत्या पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापारही ६० टक्के वाढणार आहे. दोन्ही देशांनी धोरणात्मक भागीदारी करण्याचे मान्य केले असून ऊर्जा क्षेत्रात पेट्रोलियमच्या माध्यमातून सहकार्य केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राजे महंमद बिन झायद अल नहयान यांनी एकमेकांच्या देशांना सहकार्य करण्याचे मान्य केले असून भारतीय कंपन्याही अमिरातीत काम करू शकतील, त्यांना संधी दिली जाईल, असे महंमद बिन झायद यांनी सांगितले. भारत-अमिरात यांचा वार्षिक व्यापार १९७० मध्ये १८० दशलक्ष डॉलर होता. तो आता ६० अब्ज डॉलर इतका आहे. संयुक्त अरब अमिरात हा भारताचा चीन व अमेरिकेनंतर तिसरा व्यापारी भागीदार आहे. पायाभूत सुविधा निधीसह अमिरातीने गुंतवणूक ७५ अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे ठरवले आहे.

पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका
दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या देशांवर भारत व संयुक्त अरब अमिरात यांनी टीका केली, या टीकेत पाकिस्तानचा अप्रत्यक्ष उल्लेखही झाल्याचे समजते. दहशतवाद पसरवणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांचे अड्डे नष्ट केले पाहिजेत, काही देश जो दहशतवाद पुरस्कृत करतात त्याचा विरोध केला पाहिजे, असे दोन्ही देशांनी चर्चेनंतर काढलेल्या ३१ मुद्दय़ांच्या निवेदनात म्हटले आहे.

स्मार्ट सिटी मसदरला भेट
पंतप्रधान मोदी यांनी शून्य कार्बन असलेल्या मसदर या स्मार्ट शहराला भेट दिली. तासभर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अबुधाबीच्या आग्नेयेला १७ कि.मी. अंतरावर मसदार शहर आहे. मोदी यांनी अभ्यागत पुस्तिकेत सायन्स इज लाइफ असा अभिप्राय या वेळी लिहिला. स्वयंचलित मोटारीतून मोदी यांनी सफर केली. तेथे प्रायव्हेट रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम आहे.  भारताला २०२२ पर्यंत १७५ गिगावॉट सौरशक्तीची गरज आहे व त्यात ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानांची गरज आहे, असे मोदी यांनी सांगितले. मायक्रो नॅनो फॅब्रिकेशन व्यवस्था व मायक्रोस्कोपी प्रयोगशाळेला त्यांनी भेट दिली.

परदेशातून पुन्हा गेल्या सरकारवर टीकास्त्र
मसदर, संयुक्त अरब अमिरात: संयुक्त अरब अमिरातीमधील गुंतवणूकदारांना भरतात १ महापद्म डॉलर्सची गुंतवणूक करण्याची संधी आहे व त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. सरकार लगेच या गुंतवणूकदारांना मदत करण्यास तयार आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील ३४ वर्षांची व्यापारातील कमतरताही दूर होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले आहे.
मागील सरकारांच्या निर्णायक क्षमतेच्या अभावामुळे तसेच ढिसाळ कारभारामुळे जी प्रक्रिया थांबली होती ती आपण पुढे नेऊ इच्छितो. जो वारसा आम्हाला मिळाला आहे तो जरा अडचणीचा आहे. चांगल्या बाबी घेऊन वाईट गोष्टी सहज मागे टाकणे इतके सोपे नाही. आता जे राहून गेले ते सुरू करणे याला अग्रक्रम दिला जाईल असे मोदी यांनी स्पष्ट केले. जागतिक संस्थांनी भारताची विकास क्षमता मान्य केली आहे. एकीकडे भारताची वाढ वेगाने होते आहे.
उद्योजकांच्या अपेक्षा
एकखिडकी योजना, सर्व परवाने एकत्र मिळावेत, उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया सोपी करावी अशा मागण्या या वेळी गुंतवणूकदारांनी केल्या. भारतात आता निर्णयक्षम सरकार असल्याने १ महापद्म डॉलर्स ही गुंतवणूक जास्त वाटत असली तरी होऊ शकते. भारत हा संधींचा देश आहे.  एतिसलॅट, एतिहाद एअरवेज एमिरेट्स, डी. पी. वर्ल्ड, कमर्शियल बँक ऑफ दुबई, एमार समूह यांच्या प्रमुखांशीही मोदींची चर्चा झाली.

काँग्रेसची टीका
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाऊन मागील सरकारची उणीदुणी काढतात, तशी त्यांना सवयच लागली आहे, त्यांनी असे करण्यापासून दूर रहावे, अशी सूचना काँग्रेसने केली आहे. परदेशात जाऊन टीका करतात ते चुकीचे आह असे काँग्रेस प्रवक्ते मीम अफजल यांनी सांगितले. पूर्वीच्या सरकारच्या निर्णयशून्यतेचा वारसा मिळाला पण आमचे सरकार  गतिमानतेने निर्णय घेत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या संयुक्त अरब अमिरातीतील दौऱ्यात स्पष्ट केले होते.