‘आपल्याकडील शिक्षण ‘चलता है’ पद्धतीने चालते. शिक्षणातील प्रत्येक लहान सुधारणेसाठी संसदेत कायदा करण्याची गरज नसते. प्रत्येक विद्यार्थ्यांला ‘सेलिब्रिटी’ मानून त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला हवे,’ असे म्हणत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी  यांनी शिक्षणासाठी ‘हेड, हार्ट आणि हँड’ असा नारा दिला.
‘व्हायब्रंट गुजरात नॅशनल एज्युकेशन समीट’ चे शुक्रवारी मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. इटलीचे राजदूत डॅनियल मान्चिनी, गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू दिनेश सिंग, बफेलो विद्यापीठाचे प्रा. चार्ल्स झुकोस्क, ह्य़ुस्टन विद्यापीठाच्या प्रा. लता रामचंद्र आदी या वेळी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, ‘‘शिक्षित माणूस नवीन व्यवस्था विकसित करण्यासाठी सक्षम असणे गरजेचे आहे. पांढरपेशा नोकरीव्यतिरिक्त इतर कामे वाईट, ही समजूतही काढून टाकायला हवी. कोणत्याही टप्प्यावर शिक्षणाचे अधिकाधिक दरवाजे खुले व्हायला हवेत. गुजरातमध्ये दहावीपूर्वी ठराविक प्रकारचे तंत्रशिक्षण घेणाऱ्यांना दहावी पास असा दर्जा दिला जातो, तर दहावीनंतर तंत्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना बारावीचा दर्जा मिळतो. त्यामुळे अभियांत्रिकीची दारे त्यांच्यासाठी खुली होतात. शिक्षणव्यवस्था केवळ नोकरशहांना तयार करण्यासाठी नसते. देशाला समाज निर्मात्यांची अधिक गरज आहे. गुजरातमध्ये सरकारी अधिकाऱ्यांसाठी ‘स्वान्त सुखाय’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात अधिकाऱ्यांनी सरकारी कामाबरोबरच आपल्या आवडीचा एखादा प्रकल्प समाजासाठी राबवणे अपेक्षित आहे. सरकारी व्यवस्थेत असे बदल आणण्यासाठी हिम्मत लागते आणि माझ्याजवळ ती जरा जास्तच आहे. सरकारी व्यवस्थेतही हा बदल घडू शकला. मग शिक्षणव्यवस्थेत तो निश्चितपणे घडवता येईल.’’
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला इटली सरकारचे विशेष साहाय्य लाभले आहे. ३३ राज्यांमधून विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी परिषदेसाठी हजेरी लावली असून चाळीस देशांमधून सुमारे २०० विद्यार्थीही आले आहेत. उच्च शिक्षणाचे भविष्य, विशिष्ठ विषयांना धरून सुरू झालेली सेक्टरल विद्यापीठे, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन यातील नवे प्रवाह अशा विविध विषयांवर परिषदेत चर्चा होणार आहे.