पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह नवी दिल्लीत एक दिवस उपोषण करणार आहेत. गुरुवारी 12 एप्रिल रोजी हे उपोषण करण्यात येणार असून संसदेचं बजेट सत्र विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवलं याचा निषेध नोंदवण्यासाठी हे उपोषण करण्यात येणार आहे.

शुक्रवारी भारतीय जनता पार्टीनं देशपातळीवर उपोषणाची घोषणा केली होती. ठप्प झालेल्या संसदेच्या कामकाजाचं खापर भाजपानं काँग्रेसच्या डोक्यावर फोडलं आहे. याचा निषेध म्हणून देशभरात 12 एप्रिल रोजी संप करण्याचे व काँग्रेसचा प्रतीकात्मक निषेध करण्याचे भाजपाने जाहीर केले आहे.
भाजपाला 21 राज्यात सरकारनं सत्ता दिली असल्यामुळे काँग्रेस भाजपाशी शत्रुत्वानं वागत असल्याचा आरोप केंद्रीय अनंथ कुमार यांनी केला आहे. संसदेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ठेवलेल्या चहापानालाही काँग्रेसने उपस्थिती लावली नाही आणि हा बहिष्कार टाकताना संसदेमधला गोंधळ नीट हाताळला गेला नसल्याची भावना व्यक्त केली.

एससीएसटी अॅक्टसंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालावरूनही दोन्ही पक्षांनी एकमेकांना लक्ष्य केले आहे. भाजपानं भारत बंदच्या दरम्यान परिस्थिती नीट हाताळली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर भाजपा दलितविरोधी असल्याचा चुकीचा प्रचार काँग्रेस करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे.

आता, देशभरात भाजपाचे कार्यकर्ते 12 एप्रिल रोजी उपोषण करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह दोघंही यामद्ये सामील होणार असल्याने सगळ्यांचे लक्ष याकडे असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.