भारतीय जनता पक्ष आपल्या ५० टक्क्यांहून जास्त लोकसभा खासदारांचा पत्ता कट करु शकतं. खासदारांनी त्यांच्या मतदारसंघ आणि सभागृहात केलेल्या कामगिरी तसंच सोशल मीडियावरील उपस्थितीच्या आधारावर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. ‘द वीक’ सोबत केलेल्या चर्चेमध्ये एका ज्येष्ठ भाजपा नेत्याने सांगितलं आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह दोघेही लोकसभा खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत. खासदारांच्या कामगिरीवर ते संतृष्ट नाहीयेत. कामगिरीच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे’.

पूर्व भारतात भाजपाचं निवडणूक धोरण आखण्यात महत्त्वची भूमिका बजावणा-या या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेत्यांसोबत मिळून पक्ष खासदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदारांना स्पष्टपणे कामगिरी केली नसेल, तर तिकीट मिळेल याची आशा ठेवू नका असं सांगितलं. पक्षाने २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी काही अटी ठेवल्या असून त्यानुसारच तिकीट वाटप केलं जाणार आहे.

भाजपा नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारी त्यांनाच दिली जाणार आहे ज्यांनी आपल्या मतदारसंघात चांगलं काम केलं आहे. सोबतच केंद्रीय योजना आपल्या लोकसभा मतदारसंघात योग्य पद्धतीने लागू केल्या, याशिवाय सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह आहेत अशांनाच प्राथमिकता दिली जाणार आहे. सोशल मीडियावर सक्रिय असण्याचा अर्थ म्हणजे त्याचे लाखांमध्ये फॉलोअर्स आहेत. एका नेत्याने सांगितल्यानुसार, ‘ज्यांची सोशल मीडियावर फॉलो करणा-यांची संख्या जास्त आहे, ते नक्कीच आपल्या मतदारसंघात लोकप्रिय आहेत’.