भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्यापाठोपाठ गोपीनाथ मुंडे तसेच अरुण जेटली यांनीही नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवारीला रविवारी पाठिंबा दिला. ज्येष्ठ नेते अडवानी यांनीही मोदी हे विकासाचे ‘रोल मॉडेल’ असल्याची प्रशंसा पक्षाचे केली. इतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन त्यांनी केले.
जेटली म्हणाले,” मोदी यांच्यासारखा नेता असल्याचा भारतीय जनता पक्षाला अभिमान वाटतो. ते लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे ठेवणे ही साहजिक बाब म्हणावी लागेल. पक्षाच्या बिहार शाखेचे प्रमुख सी.पी. ठाकूर यांनी म्हटले आहे की लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली  यांनी मोदी यांना दिलेला पाठिंबा म्हणजे संपूर्ण पक्षाची व्यापक भूमिका असे मानता येईल. यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षाच्या योग्य वेळी योग्य त्या व्यासपीठावरून घेण्यात येईल.
मोदी हे पंतप्रधान होण्यास सक्षम आहेत. त्यांच्याबाबत स्वराज यांनी केलेल्या वक्तव्याने मला समाधान वाटते, असे मुंडे यांनी अहमदाबादमध्ये पत्रकारांना सांगितले. दरम्यान, गुजरातमध्ये कॉंग्रेस पक्ष सत्ताधारी आणि विरोधी पक्ष म्हणून अयशस्वी ठरला असल्याची टीका मोदी यांनी प्रचार सभांतून केली. अहमद पटेल यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याची हिंमत कॉंग्रेस पक्ष दाखवू शकला नाही, असे त्यांनी नमूद केले.