फुटीरतावाद आणि दहशतवाद यांना प्रोत्साहन देणारी भारतीयांमधील ‘तात्पुरती भिंत’ आता नष्ट झाली असल्याचे सांगून, जम्मू- काश्मीरशी संबंधित अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित केला.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असलेला ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि जम्मू- काश्मीर राज्याचे दोन केंद्र शासित प्रदेशांत औपचारिक विभाजन यानिमित्त मोदी यांनी नर्मदेच्या केवडिया वसाहतीत एका मेळाव्याला संबोधित केले. गेली अनेक दशके अनुच्छेद ३७० आपणा भारतीयांमध्ये एका तात्पुरत्या भिंतीसारखा उभा होता. या भिंतीपलीकडील आमचे बंधूभगिनी नेहमीच संभ्रमावस्थेत असत. आज मी सरदारसाहेबांच्या या भव्य पुतळ्यापुढे उभा राहून त्यांच्यासमोर नतमस्तक होत होऊन सांगतो आहे, की काश्मिरात फुटीरवाद आणि दहशतवाद यांना प्रोत्साहन देणारी ही भिंत पडली असून त्यामुळे सरदारसाहेब, तुमचे अपुरे स्वप्न पूर्ण झाले आहे.

काश्मीरचा प्रश्न आपल्याकडे सोपवण्यात आला असता, तर तो सोडवण्यासाठी इतका वेळ लागला नसता, असे सरदार पटेल यांनी एकदा म्हटले होते. जम्मू व काश्मीरचे भारताशी संपूर्ण एकात्मीकरण, हाच या मुद्दय़ावरील तोडगा असल्याचे ते म्हणाले होते. अनुच्छेद ३७० रद्द करण्याबाबत ५ ऑगस्टला घेतलेला निर्णय आज सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना समर्पित करतो, असे सरदार पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या शेजारील व्यासपीठार उभे राहून मोदी यांनी सांगितले.