‘टाईम’ मासिकाने वाचकांना ऑनलाइन मत नोंदविण्यास सांगून तयार केलेल्या जगभरातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्थान मिळविले आहे. या १०० जणांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतिन सर्वोच्च स्थानावर आहेत. अंतिम गणनेत ६.९५ टक्के मत प्राप्त करून पुतिन यांनी हे स्थान प्राप्त केले. नरेंद्र मोदींना ०.६ टक्के मते मिळाली. यातील ३४ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने मत नोंदविले, तर ६६ टक्के लोकांनी त्यांच्याविरुद्ध मत नोंदविले. मोदींनी मागील वर्षी भारताची अर्थव्यवस्था मार्गावर आणण्याचा संकल्प करीत सत्ता प्राप्त केली. मुख्य आर्थिक विकास आणि अमेरिकेबरोबर जवळचे संबंध प्रस्थापित केले. गतवर्षी त्यांनी अमेरिकेचा ‘रॉक स्टार’ दौरा केल्यानंतर जानेवारी महिन्यात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा पाहुणचार केल्याचे मोदींची लोकप्रियता वर्णन करताना ‘टाईम’ने म्हटले आहे.
केजरीवाल यांना ०.५ टक्के मत मिळाली असून, ७१ टक्के मतदारांनी केजरीवाल यांना या यादीत स्थान मिळायला नको होते असे म्हटले आहे. केजरीवाल यांनी २०१३ मध्ये अल्पकाळासाठी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेतृत्व करीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांचा सुपडासाफ केल्याचे टाइम मासिकाने म्हटले आहे.
सुरुवातीला या यादीत भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचेदेखील नाव होते. परंतु, १०० व्यक्तींच्या यादीत टिकून राहण्यासाठी त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. यादीतील अन्य व्यक्तींमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार हिलरी क्लिंटन, अध्यात्मिक नेता दलाई लामा, ‘हॅरी पॉटर’ चित्रपटाची अभिनेत्री एम्मा वॉटसन, नोबेल शांती पुरस्कार सन्मानित मलाला युसूफजाई, पोप फ्रांसिस, बराक ओबामा आणि मिशेल ओबामा, फेसबुकचे सीईओ मार्क जुकेरबर्ग, अॅपलचे सीईओ टिम कुक आणि चीनचे अध्यक्ष शी जिंनपिंग इत्यादींचा समावेश आहे.
यादीत भारतीय वंशाचे अमेरिकी सर्जन जनरल विवेक मूर्ती यांचा समावेश असून, जन्माने भारतीय असलेले मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेल यांचेदेखील नाव आहे. याशिवाय मीडिया दिग्गज ऑप्रा विन्फ्रे, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि याहूच्या सीईओ मारिसा मेयर यांनीदेखील यादीत स्थान मिळविले आहे.
एकूण मतदानाच्या अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजेच जवळजवळ ५७.३८ टक्के मते ही अमेरिकेतून आली असून, कॅनडातून ५.५४ टक्के मते आणि ब्रिटनमधून ४.५५ टक्के मते नोंदविण्यात आली. ‘टाईम’च्या या यादीची अधिकृत घोषणा आठवड्याच्या अखेरीस करण्यात येईल. टाईम मासिकाच्या संपादकानी वाचकांना मागील वर्षी राजकीय, मनोरंजन, व्यवसाय, विज्ञान, धर्म आणि अन्य क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय बदल घडवून आणणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींना ऑनलाईन मत देण्याचे आवाहन केले होते.
(सौजन्य – वृत्तसंस्था)