पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक प्रश्न विचारला आहे. त्यांच्या फॉलोअर्सकडून त्यांनी या प्रश्नाचं उत्तर मागितलं आहे. मोदींनी खरं तर एक ट्विट कोट करुन ते रिट्विट करत काही उत्तर असतील तर सांगा असं म्हटलं आहे. मोदींनी कोट करुन रिट्विट केलेल्या ट्विटमध्ये ‘या ट्रेनवर किती कंटेनर्स ठेवण्यात आलेत?, मोजून सांगा बरं. पश्चिमेकडे मालवाहतूक करण्यासाठीचा समर्पित मार्ग (वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोअर इन इंडिया) आहे,’ असं मूळ ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे ट्विट मोदींनी शेअर करत त्यांच्या चाहत्यांकडे यासंदर्भातील उत्तर मागितलं आहे. मोदींच्या या ट्विटवर साडेचार हजारांहून अधिक रिप्लाय आलेत. काहींनी कंटेरन किती आहेत ते सांगितलं आहे तर काहींनी भारतीय अर्थव्यवस्थेला भरारी घेण्यासाठी ही संख्या पुरेशी असल्याचं म्हटलं आहे. काहींनी मोदींना या कॉरिडोअरसाठी धन्यवाद म्हटलं आहे.

मोदींनी गुरुवारी पश्चिम रेल्वेचा हा मालवाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या समर्पित मार्गावरील ३०६ किलोमीटर लांबीच्या न्यू रेवाडीृ ते न्यू मदारखंड पल्ल्यांचे उद्घाटन करत तो राष्ट्राला समर्पित केला. तसेच त्यांनी न्यू अटेली ते न्यू किशनगड दरम्यान धावणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या डबल स्टॅक लाँग हॉल कंटेनर ट्रेन ऑप्रेशन्सला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रे दीड किमी लांबीची असून त्यावर एकावर एक या पद्धतीने दुप्पट क्षमेतेने कंटेनरची वाहतूक केली जाते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री पीयूष गोयल, राजस्थान राज्यपाल कलराज मिश्र आणि हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्यही उपस्थित होते. त्याचप्रमाणे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही या कार्यक्रमाला हरज होते. याच मार्गावरील या विशेष रेल्वेचा व्हिडीओ शेअर करत मोदींनी ट्रेनवर किती कंटेनर आहेत सांगा पाहू असा प्रश्न विचारलाय.

पंतप्रधानांनी या मार्गाच्या उद्घाटनाच्या वेळी राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र, हरयाणा आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांना, उद्योजकांना, व्यापाऱ्यांना या ट्रेनमुळे प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर हा पूर्वेचा असो किंवा पश्चिमेचा असो तो केवळ मालगाड्यांसाठीचा आधुनिक मार्ग नसून देशाचा वेगाने विकास होण्यासाठी उभारण्यात आलेला कॉरिडोअर आहे, असं म्हणाले होते.