घोषणाबाजी आणि गोंधळ घालून सातत्याने संसदेचे कामकाज रोखून धरणाऱ्या काँग्रेसला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खडे बोल सुनावले. गेली ६० वर्षे देशावर राज्य करणाऱ्यांना आता संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे नवीन वर्षात काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा आणि देशाच्या विकासात अडथळा आणू नये, असे टोला मोदी यांनी लगावला.
दिल्ली-मेरठ या १४ पदरी द्रुतगती मार्गाच्या कोनशिला अनावरणासाठी मोदी गुरुवारी नोएडामध्ये आले होते. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा घेतानाच विरोधी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, लोकांनी संसदेमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी, वेगवेगळी मते मांडण्यासाठी आपल्याला निवडून दिले आहे. ते आपले काम आहे. ज्यांना देशातील जनतेने नाकारले, ते आता गोंधळ घालून संसदेचे कामकाज चालू देत नाहीत. संसदेचे कामकाज त्यांच्याकडून रोखले जाते आहे. पण देशातील गरिबांच्या विकासासाठी संसदेचे कामकाज सुरळीतपणे झालेच पाहिजे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालविण्याचा संकल्प करावा, असे त्यांनी सांगितले.
विकासासोबत पुढे जायचे असेल, तर गावांना शहरांशी जोडणारे चांगले रस्ते हवे आहेत, हे ग्रामीण भागातील लोकांनी ओळखले आहे. देशातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून प्रयत्न करण्यात येऊ लागले. दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्ग हा विकासाचा राजमार्ग ठरणार आहे, असे सांगून ते म्हणाले, देशापुढील प्रत्येक संकटाचे संधीमध्ये रुपांतर करण्याचा आमच्या सरकारचा स्वभाव आहे. त्यामुळे विकासकामांची गतीही वाढणार असून, त्याचा दर्जाही अधिक चांगला होणार आहे.