पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला ६८ वा वाढदिवस वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघात साजरा करण्याची शक्यता आहे. शालेय विद्यार्थ्यांसमवेत दिवसभर राहून ते त्यांच्याच जीवनावर आधारित चित्रपटही पाहणार आहेत, असे जिल्ह्य़ातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

मोदी १७ आणि १८ सप्टेंबर रोजी वाराणसीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या दौऱ्यात ते प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहेत आणि त्यानंतर त्यांची जाहीर सभाही होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘चलो जीते है’ हा ३२ मिनिटांचा चित्रपट तयार करण्यात आला आहे. आपल्या दौऱ्यात मोदी कोटय़वधी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटनही करण्याची शक्यता आहे. मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन कडेकोट सुरक्षा ठेवण्याची व्यवस्थाही केली जात आहे.

आता विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यातही काँग्रेस अपयशी – मोदी

विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यामध्येही काँग्रेस अयशस्वी ठरल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांचा खरा चेहरा समोर आला आहे, असे मोदी म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. गेल्या चार वर्षांत काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे, यापूर्वी चांगले सरकार देण्यात अपयशी ठरल्याने आणि निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने आणि भ्रष्टाचारामुळे जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचले आणि आता ते विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यासही अयशस्वी ठरले आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.

विरोधक जनतेची दिशाभूल करीत असल्याची मोदींची टीका

राफेल खरेदी करार, बँक घोटाळे आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर हल्ला चढविला. सरकारने केलेली चांगली कामे समाजकंटकांना बोचत आहेत, त्यामुळेच सरकारवर टीका होत आहे, असेही ते म्हणाले. भाजप केवळ घोषणा करीत नाही तर कृती करतो, सबका साथ सबका विकास हा प्रेरणामंत्र आहे, कोणत्याही राजकीय पक्षात असे म्हणण्याची हिंमत नाही, इतर पक्षांनी केवळ मतांचे राजकारण करीत निवडणुका जिंकल्या, असेही ते म्हणाले.