पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळची तुलना सोमालियाशी केल्याबद्दल त्यांच्यावर टीका करणारे मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांना भाजपने लक्ष्य केले आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या विविध कल्याणकारी कायद्याची अंमलबजावणी केरळमध्ये झालीच नसल्याचा आरोप भाजपने केला.
अनुसूचित जाती-जमातीच्या फायद्यासाठी केंद्र सरकारने अनेक कायदे केले, मात्र केरळमध्ये त्याची अंमलबजावणीच करण्यात आली नाही, हा राज्याचा अपमान नाही का, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. राजशेखरन यांनी केला.
मोदी यांनी केरळची तुलना सोमालियाशी केल्यावरून चंडी यांनी मंगळवारी मोदी यांच्यावर टीका केली होती. मोदी यांनी राज्याचा अपमान केला आहे, मोदी यांनी राजकीय सभ्यता दाखवावी आणि आपले विधान मागे घ्यावे, असे चंडी यांनी म्हटले होते. मात्र आता चंडी यांनी मल्याळी स्वाभिमानाचा प्रश्न निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला आहे, असे राजशेखरन म्हणाले.