भारत आता बदलला असून पूर्वीसारखे वातावरण राहिलेले नाही. गुंतवणुकीला पोषक असे वातावरण आमच्या सरकारने देशात निर्माण केले असून जर्मन कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील कार्यक्रमात केले. जर्मन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी यांनी यावेळी काही उपाययोजनाही मांडल्या.
येथे आगमन झाल्यानंतर हॅनोव्हर व्यापार मेळ्यात इंडो-जर्मन उद्योग शिखर बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले की, तुम्ही भारतात आलात तर वातावरण बदललेले दिसेल. तुम्ही भारतात या व आमच्याकडील उद्योग व गुंतवणुकीस अनुकूल वातावरणाचा अनुभव घ्या, जुने समज विसरून जा असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ या योजनेविषयी मोदी यांनी विस्ताराने सांगितले. एक जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताला उदयाला यायचे असून त्यात  नियम व र्निबधांचे अडथळे  येणार नाहीत. वेळ पडली तर त्यासाठी काही सुधारणाही करण्याची आमची तयारी आहे, असे मोदी यांनी यावेळी उपस्थित दोन्ही देशांच्या उद्योजकांना सांगितले. यावेळी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल उपस्थित होत्या.

मोदी म्हणाले..
* अनेक अयोग्य करप्रणाली दूर केल्या आहेत
* पूर्वलक्षी प्रभावाने कर गोळा करणे बंद केले आहे
* पूर्वीच्या सरकारांनी परदेशी कंपन्यांवर लावलेले दावे मागे घेतले आहेत

भारत आता बदलला आहे. आमची नियंत्रण व्यवस्था अधिक पारदर्शक, प्रतिसादक व स्थिर बनली आहे. आम्ही त्यासाठी दीर्घकालीन भविष्यवेधी उपाययोजना केल्या आहेत. परदेशी गुंतवणूकदारांना भेडसावणाऱ्या समस्या दूर केल्या आहेत त्यामुळे भारतात गुंतवणूक करा. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हॅनोव्हर येथील व्यापारी मेळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रॉस्पेक्टस ऑफ इंडो-जर्मन हाय टेक्नॉलॉजी कोलॅबरेशन’ या माहितीपुस्तकाचे प्रकाशन केले.

* भूसंपादन कायद्यावरून देशात वाद सुरू असला तरी सुधारित कायदा अंमलात आणण्याचा भारताचा इरादा असल्याचे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
* शेतकऱ्यांचे तसेच जमीन मालकांचे कोणतेही नुकसान होऊ न देता नव्या चौकटीत हा कायदा अंमलात आणला जाईल, अशी ग्वाही मोदी
यांनी दिली.
* पारदर्शी पर्यावरणीय मंजुऱ्या आम्ही देत असून उद्योजकांसाठी भूसंपादन हा मुद्दा किचकट राहणार नाही याची हमी घेतली जाईल, असेही मोदी यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे सुचवले.