भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची मनधरणी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. अडवानी यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती मोदी यांनी अडवानींकडे केलीये.
भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या अडवानी यांनी सोमवारी दुपारी आपल्या सर्व पदांचे राजीनामे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याकडे दिले. संसदीय मंडळ, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि निवडणूक समिती या तिन्ही पदांचा राजीनामा राजनाथसिंह यांच्याकडे त्यांनी पाठविला. तशा आशयाचे पत्र त्यांनी राजनाथसिंह यांना लिहिले. अडवानी यांच्या या राजीनामा अस्त्रामुळे घायाळ झालेले पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते तातडीने अडवानींच्या निवासस्थानी त्यांच्या मनधरणीसाठी पोचले.
नरेंद्र मोदी यांची प्रचारप्रमुखपदी निवड झाल्याला २४ तास उलटायच्या आत अडवानी यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय गोटात विविध चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मोदी यांनी अडवानी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.