News Flash

जागतिकीकरणविरोधी प्रवाह धोकादायक

दावोस येथे येण्यापूर्वी भारताची आर्थिक यशोगाथा मांडणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले होते

दाओसमधील जागतिक अर्थ परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

दावोस परिषदेत नरेंद्र मोदी यांचा इशारा

‘देशादेशांमध्ये व्यापार अधिक खुला होण्याऐवजी भिंती उभ्या केल्या जात आहेत. आयात करांमध्ये वा बिगर करविषयक अडथळ्यांमध्ये वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय व्यापार संकुचित होत आहे. अलीकडे देश आर्थिक विकासाबाबत स्वतपुरताच विचार करत आहेत. या अडथळ्यांमुळे द्विपक्षीय व्यापार संबंधालाच खीळ बसली असून हे धोकादायक आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जागतिक अर्थ परिषदेच्या उद्घाटन समारंभात दिला. जागतिकीकरणविरोधी प्रवाह अर्थव्यवस्थांसाठी आव्हान निर्माण करत आहे. त्यामुळे मतभेद आणि भेदाभेद दूर करून नव्या जगाची उभारणी केली पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले. दावोसला भेट देणारे मोदी हे २० वर्षांतील पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

दावोस येथे येण्यापूर्वी भारताची आर्थिक यशोगाथा मांडणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले होते. उद्यम सुलभतेवर केंद्र सरकारने भर दिला असून त्याचा संदर्भ घेत मोदी म्हणाले, ‘आता भारतात गुंतवणूक करणे, उत्पादन करणे आणि काम करणे अधिक सोपे झाले आहे. परवानाराज समूळ नष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न असून रेट टेपची जागा रेड कार्पेट घेईल’.

अमेरिकेने अर्थकारण आणि परदेशनीतीत ‘स्वहित प्राधान्य’ धोरण राबवले असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प अर्थ परिषदेच्या शेवटच्या दिवशी हजेरी लावणार आहेत. यापाश्र्वभूमीवर मोदींच्या टिप्पणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदीमध्ये केलेल्या ४० मिनिटांच्या भाषणात मोदींनी जगभरात वाढत असलेल्या मतभेदांवरही टीका केली. ‘देशादेशांमधील गटतट आणि त्यांचे भेदाभेद वाढत आहेत. मात्र ते मिटवण्यासाठी कोणत्या मार्गाने गेले पाहिजे, त्यासाठी कोणते परस्पर सहकार्य केले पाहिजे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे’, असे मत मोदींनी मांडले.

उपनिषदे, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांची वचने उद्धृत करताना, दहशतवादाने जगातील शांतता, सुरक्षा धोक्यात आणली असल्याने त्याचा बीमोड करणे मोठे आव्हान आहे, असे मोदी म्हणाले. ‘दहशतवाद जगासाठी धोकादायक असतो, पण चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद असा कृत्रिम भेद करण्याचा प्रयत्न अधिक धोकादायक आहे,’ असे त्यांनी बजावले. भेदाभेदाचे राजकारण करण्यापेक्षा सहकार्यातून जगाला दहशतवादमुक्त स्वर्ग बनवू या, असा नाराही मोदींनी दिला. ‘धनसंपत्तीसह निरोगी आयुष्य आणि समृद्धीसह स्वास्थ्य हवे असेल तर भारतात या’, असे व्यापक आवाहन मोदी यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 3:31 am

Web Title: narendra modi commenetd on globalization in world economic forum 2018 at davos
Next Stories
1 पंतप्रधान मोदी मला न्याय द्या!
2 दावोस अर्थ परिषदेत पंतप्रधान म्हणाले..
3 परिस्थिती चिघळल्यास दाद मागण्याची परवानगी!
Just Now!
X