‘अफगाणिस्तानने दहशतवादाचे चटके सहन केले आहेत. सदैव युद्धजन्य परिस्थितीत वावरणाऱ्या अफगाणी नागरिकांनी दहशतवादाला झिडकारून लावले आहे. अफगाणी जनतेने हा निर्धार कायम ठेवावा अन्यथा बाह्य़ शक्ती फुटीरतेवर टपलेल्याच आहेत. काही देशांना अफगाणिस्तानशी तात्कालिक मैत्री हवी असते. मात्र, भारत सदैव अफगाणिस्तानचा मित्र असून आमची ही मैत्री चिरकाल टिकणारी आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. भारताच्या मदतीने येथे बांधण्यात आलेल्या धरणाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
अफगाणिस्तानातील अनेक विकासकामांत भारताचा सहभाग आहे. यातील महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे येथील हरिरुर्द या नदीवर उभारण्यात आलेले धरण. या धरणाला पूर्वी सलमा धरण असे संबोधले जात असे. मात्र, भारताने एक हजार ७०० कोटी रुपये खर्चून या धरणाची पुनर्बाधणी केली. त्याचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येथे आले होते. या वेळी त्यांनी भारत-अफगाणिस्तान मैत्रीसंबंधांना महत्त्व दिले. ते म्हणाले की, काही देशांना अफगाणिस्तानशी तात्पुरती मैत्री हवी असते. मात्र, भारताने कायमच अफगाणिस्तानशी मैत्रीचे संबंध ठेवले आहेत. कोणत्याही परिस्थितीत या मैत्रीत बाधा आली नाही. युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा आहे. राजकीय, भौगोलिक अडथळे, आमच्या आस्थापनांवर झालेले दहशतवादी हल्ले या सगळ्याला न जुमानता ही मैत्री अखंड राहणार आहे. २५ मिनिटांच्या या भाषणादरम्यान मोदींना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अफगाणिस्तानाचे अध्यक्ष अश्रफ घनी हेही या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, सलमा धरणाचे नाव बदलून त्यास ‘अफगाण-भारत मैत्री धरण’ असे नाव देण्यात आले. इराणच्या सीमेनजीक असलेल्या या धरणामुळे ७५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून ४२ मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. हे धरण दोन्ही देशांच्या मैत्रीचे प्रतीक असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.