नाराज घटकपक्षांना चुचकारण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न

राष्ट्रहितासाठी जनसंघ व नंतर भाजपने टीका सहन केली. लोकशाही हा विचारांचा गाभा आहे, त्यामुळेच अनेक मित्रपक्षांना बरोबर घेऊन यशस्वीपणे वाटचाल करू शकलो असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केले. भाजपच्या नवीन केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांनी स्वातंत्र्यापासून पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला.

स्वातंत्र्यानंतर भक्कम असे राष्ट्रीय पक्ष गरजेचे आहेत या हेतूने जनसंघाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तेलगु देसम, शिवसेना अशा काही मित्रपक्षांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली असताना, मोदींनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकार चालविण्याच्या कौशल्याची आठवण करून दिली. प्रादेशिक पक्षांच्या अस्मिता ध्यानात घेत, वाजपेयींनी सर्व मित्रपक्षांना बरोबर घेऊन सरकार चालविले. त्याचे कारण आमच्या रक्तातच लोकशाही मूल्ये आहेत. त्यामुळे सर्वाना बरोबर घेऊन आम्ही वाटचाल करू शकलो असे मोदींनी सांगितले. लोकशाहीत मतभिन्नता असतेच, मात्र ज्या पद्धतीत राजकीय पक्ष चालविले जातात त्यात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

जगातील सर्वात मोठे पक्ष कार्यालय

एक लाख सत्तर हजार चौरस फुटांपेक्षा अधिक जागा असलेले भाजपचे नवे मुख्यालय जगातील कोणत्याही पक्षाच्या कार्यालयापेक्षा मोठे असल्याचा दावा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केला. येत्या वर्षभरात प्रत्येक जिल्ह्य़ात भाजपचे कार्यालय असेल.