काँग्रेसने केंद्रातील कार्यकाळात एकामागून एक घोटाळे केले. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतही त्यांनी पैसे मिळवले. आता तामिळनाडूत तरी त्यांना मते देऊ नका. विकासासाठी भाजपला मते द्या, अशी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील प्रचारात आपल्या पक्षाची बाजू मांडली.
काँग्रेसने टूजी, थ्रीजी असे अनेक घोटाळे केले. त्यातील बडय़ा असामी येथीलच आहेत आणि त्या आपल्या सर्वाना माहीतच आहेत. आता हेलिकॉप्टर प्रकरणातही त्यांनी लाच घेतली आहे. हे आम्ही नाही तर इटलीतील न्यायालय म्हणते आहे, अशी टीका मोदींनी काँग्रेस किंवा सोनिया गांधी यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे केली. तसेच सरकारने केंद्रातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगार भरतीसाठी मुलाखत रद्द करून भ्रष्टाचार कमी केला, असेही ते म्हणाले. केरळमध्ये आजवर यूडीएफ आणि एलडीएफ या आघाडय़ांनी तडजोडीचे आणि संगनमताचे राजकारण करून राज्यातील सुशिक्षित मतदारांचा अपमान केला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कासरगोड येथील सभेत केली.