द्विवर्षपूर्तीनिमित्त सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची पूर्वीच्या सरकारवर टीका
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात निराशेचे वातावरण होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात जनतेच्या मनात आशा निर्माण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सभेत त्यांनी आपले सरकार गरीब व शेतकऱ्यांच्या विकासासाठी वचनबद्ध असल्याचे जाहीर केले.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षांत होणारी विधानसभा निवडणूक ध्यानात घेऊन मोदींनी त्यांची ओळख उत्तर प्रदेशचा अशी करून दिली. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा कारभार भ्रष्ट होता असा आरोप करत, माध्यमांची जागा त्याच बातम्यांनी व्यापल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या पूर्वीच्या सरकारने देशाची लूट केल्याची टीका मोदींनी केली. लाखोरीची ही संस्कृती आम्हाला हद्दपार करायची आहे.

शेतकरी केंद्रस्थानी
मोदींनी अध्र्या तासाच्या भाषणात सरकारने गरीब व शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती वारंवार दिली. ऊस उत्पादकांची थकबाकी देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत आल्यापासून प्रत्येक निर्णय गरिबांच्या हिताच्या घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन वर्षांतील निर्णय पाहिले तर लक्षात येईल.
आमच्या सरकारने केवळ ३०० दिवसांत सात हजार खेडय़ांमध्ये वीज पोहोचवली आहे. देश वेगाने पुढे जात आहे, मात्र काही जणांची मानसिकता बदलत नसल्याचे सांगत पंतप्रधानांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. विकास हे सर्व समस्यांचा उत्तर आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव बेटी पढाव, पंतप्रधान पीक विमा योजना, गरिबांसाठी एलपीजी जोडणी असा सरकारच्या काही योजनांचा उल्लेख त्यांनी केला.

सरकारी डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५
डॉक्टर्सच्या अपुऱ्या संख्येचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सरकारी सेवेतील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ करत असल्याचे जाहीर केले. या आठवडय़ात मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल. तसेच खासगी डॉक्टरांनी गरिबांची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यात प्रत्येक महिन्याच्या नवव्या दिवशी मोफत उपचार करण्याचे त्यांनी सुचवले. पंतप्रधानांच्या घोषणेचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी स्वागत केले आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होईल.