विशेष दर्जा प्रस्तावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलुगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी विकासाच्या आश्वासनांवर कोलांटउडी मारली असून, केंद्राने दिलेला निधी त्यांनी वापरलाच नाही, त्यामुळे राज्याचा विकास झाला नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

विशेष दर्जा देऊनही जेवढा पैसा आंध्रला मिळाला नसता तेवढा पैसा केंद्राने देऊनही चंद्राबाबू यांना आंध्रचा विकास करता आला नाही. त्यांनी केंद्राने दिलेला निधी न वापरल्याने राज्य विकासात मागे राहिले असे सांगून मोदी म्हणाले, की माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांनी आंध्र प्रदेशला काँग्रेसमुक्त करण्यासाठी तेलुगू देसमची स्थापन केली होती. कारण ते काँग्रेसच्या उन्मत्तपणाचे शिकार बनले होते. चंद्राबाबू यांनी नेहमीच ते वरिष्ठ असल्याची जाणीव करून दिली त्या बाबत आपल्याला आक्षेप नाही, ते वरिष्ठच आहेत. त्यांचा आपण कधी अनादरही केला नाही. पण बाबू गारू चंद्राबाबू यांनी अनेक आघाडय़ा केल्या. सासऱ्याच्याच पाठीत खंजीर खुपसला. प्रत्येक निवडणुकीत चंद्राबाबू पराभूत होत आले आहेत. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्याच संगतीला ते जात राहिले. लोकांची स्वप्ने चक्काचूर करण्यात ते अनुभवी आहेत. आंध्र प्रदेशला दिलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब आम्ही मागितला म्हणून चंद्राबाबू आम्हाला विरोध करीत आहेत. ज्या नामदारांचा उन्मत्तपणा कमी करायचा त्यांच्याच आश्रयाला आता चंद्राबाबू गेले आहेत. सासरे एनटीआर यांच्या शिकवणीविरोधात ते वागत आहेत.

चंद्राबाबू चौकीदाराला घाबरतात..

चंद्राबाबू यांनी राज्यात सूर्योदयाचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात एन. लोकेश यांच्या रूपाने पुत्रोदय झाला आहे. मी संपत्ती निर्माण करणारा आहे, मोदींना ते जमत नाही असे चंद्राबाबूच म्हणाले होते. अमरावती ते पोलावरमपर्यंत ते संपत्ती निर्माण करण्यात दंग आहेत, त्यामुळे ते चौकीदाराला घाबरतात.