देशातील सर्व खेडय़ांमध्ये वीज पोहोचली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदी यांनी रविवारी खेडय़ांच्या विद्युतीकरणाबाबत अनेक ट्वीट केले. मणिपूरमधील लिसांग या खेडय़ात शनिवारी वीजपुरवठा सुरू झाला असून आता देशातील शेवटचे गावदेखील प्रकाशमान झाले आहे. २८ एप्रिल २०१८ हा देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. भाजपप्रणीत एनडीए सरकारने दिलेले सर्वात मोठे वचन पूर्ण केले, असे मोदी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या वचनपूर्तीमुळे कित्येक भारतीयांचे आयुष्य कायमचे बदलून गेले आहे. लिसांगप्रमाणे इतर हजारो खेडी प्रकाशमान आणि सक्षमही (पॉवर्ड अॅण्ड एमपॉवर्ड) बनली आहेत, असे कौतुकोद्गार मोदी यांनी काढले आहेत. २०१५ च्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात मोदी यांनी एक हजार दिवसांत १८ हजार खेडय़ांत वीज पोहोचवण्याची ग्वाही दिली होती.
विजेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असणे आणि गावातील किमान १० टक्के घरे तसेच सार्वजनिक ठिकाणांमध्ये (शाळा, स्थानिक प्रशासकीय कार्यालये, आरोग्य केंद्र वगैरे) वीजपुरवठा होत असेल तर त्या गावाचे विद्युतीकरण झाल्याचे मानले जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 30, 2018 1:01 am