काश्मीरच्या प्रश्नावर जगाचे लक्ष वेधण्यासाठी समिती स्थापन

पाकिस्तानने सीमारेषेवर भारत नमती भूमिका घेत नसल्याने पुन्हा एकदा काश्मीरचा प्रश्न उगाळण्यास सुरुवात केली आहे. पाकने काश्मीर मुद्दा जागतिक स्तरावर नेण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जहालमतवादी धोरणांचा विरोध करणार आहे. स्थानिक वृत्तपत्र ‘डॉन’ने ही माहिती दिली आहे.

परराष्ट्र सल्लागार सरताझ अझीझ यांनी सिनेटला ही माहिती दिल्याचे डॉन वृत्तपत्राने म्हटले आहे. स्थापन करण्यात आलेल्या  समितीमध्ये संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ  अधिकारी, अंतर्गत आणि माहिती अधिकारी, लष्करी ऑपरेशनचे संचालक, आएसआय आणि आयबीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या समितीद्वारे काश्मीर मुद्दय़ावर भारताच्या विरोधी प्रचार करण्यात येणार असून, काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या मुद्दय़ांवर प्रसारमाध्यम धोरण आखण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू कमकुमत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे डॉन वृत्तपत्राने म्हटले आहे.

पाकचे काश्मीरच्या फुटीरवाद्यांना समर्थन

पाकने स्थापन केलेली ही समिती काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांना मदत करणार आहे. भारत काश्मीरमध्ये करत असलेल्या अत्याचाराबाबतची माहिती ही समिती एकत्र करून आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठेवणार आहे.