‘मन की बात’ कार्यक्रमात नागरिकांना आवाहन

कमी दर्जाचे प्लास्टिक व पॉलिथीन यामुळे पर्यावरण, वन्यजीवन व आरोग्यावर वाईट परिणाम होत असून लोकांनी प्लास्टिकचा वापर बंद करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात केले आहे. ५ जूनला पर्यावरण दिन आहे व त्यात लोकांनी झाडे लावण्यावर  लक्ष केंद्रित करतानाच प्लास्टिकचा वापर सोडावा, असे सांगून ते म्हणाले, की केवळ झाडे लावून उपयोगाची नाही ती जगतात की नाही यासाठी त्यांची काळजी घेतली पाहिजे, रोपटय़ाचा वृक्ष होईपर्यंत त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

ते म्हणाले, की पर्यावरण संरक्षण व निसर्गाबाबत संवेदनशीलता या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अलिकडे अवकाळी पाऊस व धुळीची वादळे सुटली होती, तो हवामानाचे स्वरूप बदलत असल्याचा परिणाम होता. त्यामुळे अनेक लोकांनी प्राण गमावले, असे त्यांनी सांगितले. केवळ जागतिक तपमानवाढीच्या नावाने हाकाटी पिटून चालणार नाही. त्यासाठी निसर्गाबाबत संवेदनशील राहिले पाहिजे. ते संस्कारच आपल्या संस्कृतीत रुजले पाहिजे. या वर्षी बीट प्लास्टिक पोल्यूशन म्हणजे प्लास्टिक प्रदूषण बंद करा हा प्रमुख विषय पर्यावरण दिनाला आहे. प्लास्टिकमुळे निसर्ग, वन्यजीवन तसेच आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. पृथ्वी ग्रह स्वच्छ व हिरवागार करण्यासाठी काय करता येईल यावर विचार करा. त्यासाठी अभिनव गोष्टी शोधून काढा.

२१ जूनच्या योग दिनाबाबत त्यांनी सांगितले, की योग नियमितपणे केल्याने जे फायदे होतात. त्यातून धैर्य वाढते. क्षमाशीलता व शांती मिळते. आरोग्यासाठी लोकांनी योगपद्धतीचा अंगीकार करावा.