पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती
दोन वर्षांच्या कालावधीत भाजप सरकारच्या कामगिरीवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कालावधीत ७०० योजना राबविल्याचे सांगितले. काही आघाडय़ांवर सरकारला अद्याप कामगिरी करायची आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत देशाला चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधानांनी या वेळी दिली.
केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विकास पर्व’ या कार्यक्रमात नागरी बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. मागील सरकारचे अपयश बाजूला करीत केंद्राने दोन वर्षांत प्रभावी कामगिरी केल्याचा दावा या वेळी त्यांनी केला. काँग्रेसचे सरकार डिझेल आणि पेट्रोलशी संबंधित दबावगटांना बळी पडले होते, असाही दावा पंतप्रधानांनी केला.
सरकारवर टीका करणाऱ्यांचा पंतप्रधानांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, आमच्या योजना शेतकरी आणि गरजू लोकांना लाभदायक अशा आहेत. याचा विरोधक विचार करीत नाहीत. आमच्या सरकारने कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच आठवडय़ात विरोधकांनी कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. देशातील लोक लोकशाहीबाबत बोलतात, मात्र लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या सरकारवर त्यांचा विश्वास नसतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता मिळविल्याचे त्यांना पाहवले नसेल. मी तुमच्यासाठी आणि या देशाच्या विकासासाठी उभा आहे, असेही मोदी या वेळी म्हणाले.