देशवासियांना शास्त्रज्ञांबद्दल गर्व वाटावा, अशीच ही घटना असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचल्याबद्दल इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे बुधवारी कौतुक केले. या कार्यक्रमासाठी इस्रोने मॉम (मार्स ऑर्बिटर मिशन) हे संक्षिप्त रूप वापरले होते. तोच धागा पकडून मोदी यांनी आपल्या भाषणात मंगळाला आज ‘मॉम’ मिळाल्याचे सांगितले. मॉम कधीही कोणाला निराश करीत नाही, अशी कोटीही त्यांनी आपल्या भाषणावेळी केली.
पहिल्याच प्रयत्नात भारताच्या मंगळयानाने बुधवारी सकाळी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. हा ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी मोदी स्वतः इस्रोच्या नियंत्रण कक्षात उपस्थित होते. यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर मोदी यांनी टाळ्या वाजवून सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. नियंत्रण कक्षातच त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या सर्व शास्त्रज्ञांशी संवाद साधला. मोदी म्हणाले, अपुरी साधने आणि अनेक मर्यादा असतानाही केवळ विश्वास आणि पुरुषार्थाच्या बळावर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मोठे यश मिळवले आहे. सर्वच शास्त्रज्ञ अभिनंदनास पात्र आहेत. सर्व देशवासियांना गर्व वाटावा, असाच हा क्षण आहे.
पहिल्याच प्रयत्नात भारताने मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोहोचवून इतिहास घडवला असल्याचा आवर्जून उल्लेख करून मोदी म्हणाले, सर्व आव्हानांचा सामना करण्याची ताकद भारतीय शास्त्रज्ञांमध्ये आहे. त्यासाठी जोखीम स्वीकारण्यासही ते तयार असतात. वैयक्तिक आयुष्याचा त्याग करून दिवस दिवस प्रयोगशाळेमध्ये बसून संशोधन केल्यानंतरच अशा पद्धतीचे यश मिळवणे शक्य होते, असेही त्यांनी सांगितले.
शास्त्रज्ञांनी संवाद साधल्यानंतर मोदी यांनी मंगळयानाच्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या प्रत्येक शास्त्रज्ञाचे हस्तांदोलन करून कौतुक केले.