पंतप्रधानांचा आरोप; हिमाचल सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम

कृषी कर्जमाफीवरून काँग्रेस शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काँग्रेसच्या सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासने पाळली नसल्याची टीका पंतप्रधानांनी येथील सभेत केली. हिमाचल प्रदेशमधील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सभेत पंतप्रधानांनी काँग्रेसला लक्ष्य केले. केवळ शेतकरीच नव्हे तर एक श्रेणी एक वेतन लागू करण्याच्या मुद्दय़ावर माजी सैनिकांचीही काँग्रेसने दिशाभूल केली, अशी टीका मोदी यांनी केली.

कृषी कर्जमाफीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले होते. त्याला या सभेतून पंतप्रधानांनी उत्तर दिले. २००९ मध्ये जेव्हा काँग्रेस सत्तेत आली तेव्हा त्यांनी साठ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जे माफ केली होती. प्रत्यक्षात त्यांनी सहा लाख कोटींची कर्जे माफ करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हा ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. तसेच जे शेतकरी नाहीत त्यांचीही कर्जे माफ केल्याचा ठपका  महालेखापरीक्षकांच्या अहवालात आहे. त्यामुळे त्या कर्जमाफीचा फायदा शेतकरी नसलेल्यांनी घेतल्याचे मोदींनी सांगितले. पंजाब व कर्नाटकमध्ये निवडणुकीपूर्वी त्यांनी कृषी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र सत्तेत येताच त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.

पंजाबच्या शेतकऱ्यांच्या पदरात तर काहीच पडले नाही, तर कर्नाटकमध्ये केवळ ८०० शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी हिमाचल प्रदेश सरकारने वर्षभरात केलेल्या विकासकामांच्या पुस्तिकेचे प्रकाशन पंतप्रधानांनी केले. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.