‘‘उत्तर प्रदेशचे सरकार समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव ही जोडगोळी चालवत असून, त्यांच्यामुळे या राज्याचे मोठे नुकसान झाले आहे,’’ अशी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गोरखपूर येथे केली. ‘समाजवादी पक्षाचे सरकार कधीही उत्तर प्रदेशचे गुजरातमध्ये परिवर्तन करू शकत नाही,’ असा घणाघातही त्यांनी केला.
गोरखपूरमध्ये गुरुवारी झालेल्या भाजपच्या सभेत नरेंद्र मोदी बोलत होते. वाराणसी येथे समाजवादी पक्षाच्या सभेत मुलायमसिंह यांनी मोदींवर टीका केली होती. ‘मोदी यांनी २००२मध्ये गुजरातमध्ये दंगल घडवली. मला उत्तर प्रदेशचे गुजरात करायचे नाही,’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले होते. हाच संदर्भ पकडून मोदींनी मुलायमसिंह यांच्यावर शरसंधान सोडले. ‘‘उत्तर प्रदेशचे गुजरातमध्ये परिवर्तन म्हणजे काय, हे मुलायमसिंह यांना माहीत आहे काय? गुजरातमध्ये प्रत्येक गावात आणि रस्त्यावर २४ तास वीज असते. तुम्ही हे करू शकता काय? हे सहज शक्य नाही, ते करण्यासाठी सिंहाचे काळीज पाहिजे,’’ असे मोदी म्हणाले.
२०१२च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या रहिवाशांनी समाजवादी पक्षावर विश्वास ठेवला आणि त्यांना निवडून दिले, मात्र या सरकारने केवळ जनतेची लूटमार केली आहे असा आरोप मोदींनी केला.
‘देश लवकरच काँग्रेसमुक्त’
काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी यांचा उल्लेख चहावाला असा केला होता, हाच धागा पकडून मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. एक चहावाला आपल्या विरोधात उभा राहतो हे मान्य करायला काँग्रेस तयार नाही. चहावाला असा उल्लेख करून काँग्रेसने गरिबांची थट्टा केली आहे. गरिबांसाठी काहीही न करता केवळ मते मिळवण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेण्यात येतो. त्यामुळे देश काँग्रेसमुक्त करण्याची वेळ आली आहे, अशी टीका मोदी यांनी केली. ‘‘हा देश गरीब नाही. या श्रीमंत देशातील नागरिकांना गरीब ठेवण्यात आले आहे आणि यात काँग्रेसचे राजकारण आहे,’’ असे मोदी म्हणाले.