केजरीवालांनी माफी मागण्याची भाजपची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीए आणि एमएच्या पदव्यांच्या प्रती सोमवारी भाजपने एका पत्रकार परिषदेत सादर केल्या. आम आदमी पार्टीने मोदी यांच्या पदव्यांबद्दल आरोप केल्याने खळबळ माजली होती. त्या पाश्र्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत या पदव्यांच्या प्रती सादर केल्या.

शहा आणि जेटली यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी दिल्ली विद्यापीठातून आणि गुजरात विद्यापीठातून घेतलेली पदवी यांच्या प्रती सादर केल्या. या दोन्ही नेत्यांनी त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढविला. केजरीवाल यांनी खोटेनाटे आरोप करून मोदी यांची जनमानसातील प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आणि साहसाचे राजकारण केले, असे जेटली आणि शहा म्हणाले. केजरीवाल यांनी माफी मागावी, अशी मागणीही या नेत्यांनी केली.

देशातील जनतेची दिशाभूल करणारा प्रचार करून केजरीवाल यांनी असत्याचे सत्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. केंद्राशासित प्रदेश पंतप्रधानांवर हल्ला करण्यासाठी जेव्हा बेजबाबदार वर्तन करतो, त्यामुळे संघराज्यीय यंत्रणेला धोका निर्माण झाला आहे.

केजरीवाल यांनी केलेले आरोप सिद्ध करावे, असे आवाहन या वेळी जेटली यांनी दिले. पंतप्रधानांच्या श्रेयाबद्दल केजरीवाल असत्य पसरवीत आहेत, त्यांनी देशाला बदनाम करण्याचे पाप केले आहे, मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल पत्रकार परिषद आयोजित करावी लागणे ही दुर्दैवाची बाब आहे.

‘आप’ आरोपांवर ठाम

भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदव्यांच्या प्रती सादर केल्या असल्या तरी तो दस्तऐवज बनावट असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार सोमवारी ‘आप’ने केला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या दस्तऐवजात स्पष्ट विसंगती असल्याचा आरोप आपने केला. आपचे नेते आशुतोष यांनी येथे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, बीए आणि एमएच्या गुणपत्रिकेवर असलेले मोदी यांचे नाव एकमेकांशी मिळतेजुळते नाही.