भारताचे होऊ घातलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(बुधवार) गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत निरोपाचे भाषण केले. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करतानाच्या आठवणींना उजाळा देताना नरेंद्र मोदी विधानसभेत पुन्हा भावूक झाले. देशाची सेवा करताना आपल्याला अत्यंत आनंद मिळणार आहे मात्र, गुजरात सोडून जाताना अतिशय दु:ख होत आहे. अशा भावूक शब्दांत मोदींनी गुजरात विधानसभेला अलविदा केला.
गुजरात कठीण काळात वावरत असताना जबाबदारी खांद्यावर पडली आणि भाजप सहकाऱयांच्या सहकार्याने गुजरातला पुन्हा बळकट करू शकलो याचा अभिमान असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले. तसेच गुजरातने अनुभविलेल्या भूकंपाचे स्मरणही मोदींनी आपल्या भाषणातून केले. गुजरात भूकंपाने हादरला असताना सर्व आमदारांनी खचून न जाता केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेमुळे आज गुजरात विकासाच्या पायऱया चढत आहे. यापुढेही गुजरातचा असाच जलद विकास व्हावा अशी इच्छा असल्याचेही मोदी म्हणाले आणि गुजरात सोडताना दु:ख होत असल्याचे म्हणताना मोदींचे डोळे पाणावले. त्यामुळे संसदेच्या सेंट्रल हॉल पाठोपाठ गुजरात विधानसभेतही भावूक मोदी पहायला मिळाले.
कार्यकाळादरम्यान कोणतीही चूक झाल्यास माफ करावे असेही मोदी आपल्या समारोपाच्या भाषणात म्हणाले. तसेच विकास झाला तरच मी यशस्वी झालो असे मानेन आणि आजचा विकास हा गुजरात मॉडेलचा नमूना असल्याचे म्हणत गुजरात मॉडेलचीही स्तुती मोदींनी केली. माझ्या दृष्टीने सर्व पक्षाचे आमदार समान असून प्रत्येक जण आपापल्या परिने सेवा करत असतो यावर माझा विश्वास असल्याचे म्हणून मोदींनी विरोधकांचेही कौतुक केले.
विधानसभेत मोदींच्या समारोप कार्यक्रमात उपस्थित आमदारांनीही मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. गुजरात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते शंकर सिंह वाघेला यांनीही मोदींना आपल्या भाषणात शुभेच्छा दिल्या आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यावर मोदींनी भर द्यावा अशी इच्छाही व्यक्त केली. तसेच काळापैसा भारतात आणण्यावर मोदींनी भर द्यावा असेही वाघेला म्हणाले. त्याचबरोबर नरेंद्र मोदींचे सरकार आलेले आहे त्यामुळे त्यांनी राम मंदिर बनवून दाखवावे असे म्हणत भाजपने दिलेल्या आश्वासनांचीही आठवण वाघेलांनी करून दिली.