भाजपच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर दिल्लीत प्रथमच दाखल झालेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचा विरोध करणारे पक्षाचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी चर्चा करून पक्षांतर्गत मतभेद शमविण्याचे प्रयत्न केले. मोदींपाठोपाठ सरसंघचालक मोहन भागवतही अडवाणींशी मंगळवारी चर्चा करणार होते. कुणाला आवडो वा ना आवडो, देशात हिंदूुत्वाच्याच मार्गाने परिवर्तन घडेल, असे स्पष्ट करून सरसंघचालकांनी अडवाणींसोबत होऊ घातलेल्या चर्चेची दिशा निश्चित केल्याचे मानले जात आहे.
मोदींच्या नियुक्तीच्या निषेधार्थ अडवाणी यांनी दिलेला भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा गेल्या मंगळवारी मागे घेतला होता. या राजीनामानाटय़ाच्या पाश्र्वभूमीवर अडवाणी आणि मोदी यांच्यात विद्यमान राजकीय परिस्थितीवर महत्त्वाची चर्चा झाली. रालोआचे कार्यकारी अध्यक्ष असलेले अडवाणी रालोआतील घटक पक्षांच्या माध्यमातून मोदींच्या मार्गात अडथळे तर आणणार नाहीत, अशी शंका भाजपमधील मोदी समर्थक व्यक्त करीत आहेत. अडवाणी पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यास संयुक्त जनता दल रालोआत परत दाखल होईल, असे शरद यादव यांनी म्हटल्यामुळे ही शंका आणखीच बळावली आहे.
गोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत भाजपच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर प्रथमच मोदी यांचे मंगळवारी दिल्लीत आगमन झाले. दिल्लीत पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम डॉ. मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. प्रचारप्रमुखपदी नियुक्ती केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोदी आले होते, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. मोदींच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या अडवाणींनी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे सर्व पदांचा राजीनामा देताना लिहिलेल्या पत्रातील भाषेवर मोदी यांनी डॉ. जोशींसोबत चर्चा करताना नाराजी व्यक्त केल्याचे समजते. या बैठकीनंतर मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या ३०, पृथ्वीराज रोड या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी पाऊण तास चर्चा केली. पक्षातील नव्या भूमिकेसाठी मोदींनी अडवाणींचे आशीर्वाद मागितले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान भाजपप्रणीत रालोआतून बाहेर पडणाऱ्या संयुक्त जनता दलाच्या भूमिकेवरही चर्चा झाल्याचे समजते. ज्या मित्रपक्षांनी भाजपला विरोध केला त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असेही मोदींनी अडवाणींना सांगितल्याचेम्हटले जात आहे. मोदींच्या नियुक्तीला आपला विरोध नव्हता. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी स्वतंत्र प्रचार समित्यांची स्थापना योग्य ठरली असती, असे अडवाणींनी मोदींना सांगितल्याचे समजते. अडवाणींची ही मागणी राजनाथ सिंह तसेच संघाने अमान्य करून मोदींची प्रचारप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली होती. अडवाणी आणि मोदी यांच्यातील चर्चा सौहार्दपूर्ण होती, असे अडवाणींच्या निकटस्थ सूत्रांनी सांगितले. अडवाणींशी चर्चा केल्यानंतर मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सायंकाळी मोदींनी केंद्रीय नियोजन आयोगात जाऊन नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गुजरातच्या वार्षिक योजनेवर चर्चा केली. यावेळी योजना आयोगाभोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी भाजप मुख्यालयात जाऊन मोदी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांसोबत आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीविषयीचर्चा करणार होते.