मतदारांच्या मनातील कौल काय असेल, याचा थांगपत्ता अद्याप राजकीय नेत्यांना, राजकीय पंडितांनाही लागू शकलेला नाही, असेच उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील आतापर्यंतच्या निकालांवरून म्हणावे लागेल. आतापर्यंतचे कल पाहिले तर उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळाले आहे. उत्तराखंडमध्येही मोदीलाटेत काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. उत्तर प्रदेशात मायावती, अखिलेश यादव यांचे सरकार आजमावून पाहिल्यानंतर तिसरा पर्याय म्हणून यंदा मतदारांनी भाजपकडे पाहिले आहे. प्रस्थापितांना मतदारांनी जोरदार धक्का दिला आहे. मणिपूरमध्ये १५ वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असूनही यंदा भाजपने जबरदस्त मुसंडी मारली आहे. त्यामुळे सत्तेसाठी काँग्रेसला झगडावे लागत आहे. त्यामुळे मोदींची जादू आजही कायम असून, मोदीलाटेबरोबरच ही मतदारांची प्रस्थापितांविरोधातीलही लाट आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे कल हाती आले आहेत. उत्तर प्रदेशात जादूची कांडी फिरवावी तशी भाजपला त्रिशतकी आघाडी मिळाली आहे. तर पुन्हा सत्तेचा मुकूट आपल्याच शिरपेचात असेल, असा ठाम विश्वास असणाऱ्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीला शतकी मजलही मारता आलेली नाही. केवळ ६५ जागांवरच आघाडी मिळाली आहे. तर मायावतींचा हत्ती मजल-दरमजल करत कसाबसा २१ जागांवरच आघाडी मिळवू शकला आहे. मोदीलाटेत भाजपला मिळालेले हे मोठे यश आहे. तर प्रस्थापितांना मतदारांनी ‘जोर का झटका’ दिला आहे. २००७ च्या निवडणुकीपासून या राज्यात सत्तांतर झाले आहे. २००७ मध्ये मतदारांनी मायावतींना संधी दिल्यानंतर २०१२च्या निवडणुकीत मुलायमसिंहांच्या समाजवादी पक्षाला मतदारांनी पसंती दिली होती. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी लाटेवर स्वार होऊन भाजप रिंगणात उतरली. त्यादृष्टीने उत्तर प्रदेश जिंकण्याची तयारीच भाजपने सुरू केली. मतदारांनीही मायावती आणि अखिलेश यादव यांना नाकारल्याचे दिसून येत आहे. मतदारांनी तिसरा पर्याय म्हणून भाजपला ‘साथ’ दिली आहे. प्रस्थापितांना धक्का देण्याचे तंत्र मतदारांनी यंदाच्या निवडणुकीतही अवलंबल्याचे दिसते.

पंजाबमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. काँग्रेसला आतापर्यंत ७३ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर आपचा ‘झाडू’ चालेल असे एक्झिट पोलमधून म्हटले होते. पण आपचा वारू चौखुर उधळू शकलेला नाही. काँग्रेसनंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना आतापर्यंत २६ जागांवर आघाडी मिळाली आहे. पंजाबमधील आतापर्यंतचे कल पाहता प्रस्थापित शिरोमणी अकाली दल-काँग्रेस आघाडीला मतदारांनी नाकारल्याचेच चित्र आहे. शिरोमणी अकाली दलाला अवघ्या १६ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. तर भाजपला केवळ दोनच जागांवर आघाडी मिळाली आहे. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात कमालीची नाराजी होती. ती नाराजी मतपेटीतून दिसून आली आहे. भाजपला ५३ जागांवर आघाडी मिळाली आहे. बहुमत मिळाले असले तरी येथेही प्रस्थापितांनाच चीतपट केले आहे. मुख्यमंत्री हरीश रावत हे हरिद्वार ग्रामीण मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. काँग्रेसला केवळ ११ जागांवरच आघाडी मिळाली आहे. गोव्यामध्ये मात्र काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस आहे. गोवेकरांनीही प्रस्थापितांना नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपची सत्ता आणि बालेकिल्ला असूनही येथे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाच पराभवाची धूळ चारली आहे. काँग्रेसला १२ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजप पिछाडीवर आहे. त्यांना नऊ जागांवर आघाडी मिळाली आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर ‘आप’चा झाडू चालेल असे म्हटले जात होते. पण मतदारांनी ‘आप’ची सफाईच केल्याचे दिसते आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून तिथे काँग्रेसची सत्ता आहे. सत्ताधारी काँग्रेसलाच येथे सत्तेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली लाट आजही कायम आहे, हेच निकालांवरून स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले होते. ते यश टिकवून ठेवण्याचे आव्हान भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर होते. त्यात पुढील लोकसभा निवडणुकांची सेमिफायनल म्हणून या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे पाहिले जात होते. भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये बहुमत मिळवून ही सेमिफायनल जिंकली आहे. त्यामुळे या निवडणुकांतही मोदीलाट कायम आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.