सागरी सुरक्षा, संपर्कता आणि व्यापाराला अधिकाधिक चालना देण्याबाबत गुरुवारी भारत आणि आसियान नेत्यांनी व्यापक चर्चा केली. आदर्श नियमाधारित व्यवस्थेबद्दल भारताला आपुलकी आहे, असे नमूद करून या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक नौकानयन क्षेत्राच्या स्वातंत्र्यावर भर दिला.

भारत-आसियान संबंधाना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी यांनी आसियान नेत्यांच्या उपस्थितीत भारत-आसियान शिखर परिषदेत एका टपाल तिकिटाचे अनावरण केले आणि या परिषदेचे उद्घाटन केले. भारताला आदर्श नियमाधारित व्यवस्थेबद्दल आणि शांततेच्या मूल्यांबाबत आपुलकी आहे, असे मोदी या वेळी म्हणाले.

चीनच्या आर्थिक आणि लष्करी प्रादेशिक खंबीरपणाच्या पार्श्वभूमीवर शिखर परिषदेतील सहभाग लक्षणीय होता. व्यापार आणि संपर्कतेमध्ये स्वत:ला शक्तिशाली देश म्हणून सादर करण्याची या परिषदेत भारताला नामी संधी आहे, असे काही तज्ज्ञांना वाटत आहे.

आसियान नेते प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार असून ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व घटना असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. या परिषदेमुळे दहशतवादाचा प्रतिकार, सुरक्षा आणि संपर्कता या क्षेत्रांत भारत-आसियान सहकार्याला चालना मिळण्याची शक्यता अपेक्षित आहे.

त्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आसियान नेत्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले होते. त्यावेळी नेत्यांनी सागरी सहकार्य आणि सुरक्षेबाबत मोकळेपणे चर्चा केली. मोदी यांनी थायलंड आणि सिंगपूरच्या पंतप्रधानांसह सहा आसियान नेत्यांशी परस्पर संबंधांबाबतही चर्चा केली.