आज वस्तू आणि सेवा कराच्या(जीएसटी) वर्षपूर्तीनिमित्त भाजपाकडून देशभरात ‘जीएसटी दिन’ साजरा केला जाणार आहे. अर्थमंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या सुरतसह देशाच्या अन्य भागांमध्ये व्यापारी विरोध प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. शनिवारीही व्यापाऱ्यांनी विरोध प्रदर्शन केलं त्यात काही जणांनी आपली दुकानंही बंद केली होती.

गेल्या वर्षी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ३० जून २०१७ च्या मध्यरात्री खास कार्यक्रमाचे आयोजन करून जीएसटी पर्वाची सुरुवात केली गेली. म्हणूनच हा दिवस जीएसटी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल असतील, तर सन्माननीय पाहुणे म्हणून अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला उपस्थित राहणार आहेत, असे अर्थमंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर आता वर्षभरात देशभरातील करदात्यांची संख्या 1.20 कोटी झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा आकडा 9.10 लाख आहे. राज्यातील करदात्यांचा वाटा 7 टक्क्यांवर आला आहे. एकीकडे देशातील जीएसटीदात्यांची संख्या 56 लाखांनी वाढली असताना राज्यातील ही वाढ फक्त 60 हजारांइतकी आहे. जीएसटी करप्रणालीनं सरकारच्या तिजोरीवर जास्त भार पडलेला नाही. उलट करदात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जीएसटी करप्रणालीमुळे महागाई वाढल्याचं समोर आलं आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षात न आणल्यामुळे इंधनाचे भावही भडकले आहेत.

व्यापाऱ्यांचा विरोध –
दरम्यान, शनिवारी देशातील विविध ठिकाणी व्यापारी विरोध प्रदर्शन करताना दिसले. कानपूरमध्ये व्यापऱ्यांनी वेगळ्या पद्धतीने विरोध दर्शवला. येथील व्यापारी घंटाघराजवळ भारत माताच्या मुर्तीजवळ एकत्र जमले आणि जोरजोरात घंटानाद करुन त्यांनी विरोध दर्शवला. वर्षभरापूर्वी मोदी सरकारने घंटा वाजवून जीएसटीची सुरूवात केली होती. म्हणून त्याचा विरोध घंटा वाजवून आम्ही करत आहोत असं येथील व्यापाऱ्यांनी सांगितलं. जीएसटीमुळे आम्हाल अजूनही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, सरकारने या अडचणी दूर कराव्यात. सर्व वस्तूंवर जीएसटी लावला जाईल असं सांगण्यात आलं होतं, पण आता वर्षभरानंतरही पेट्रोल उत्पादनं जीएसटी कक्षेच्या बाहेर आहेत, असं म्हणत व्यापाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. सुरतमध्येही जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्त व्यापाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा उत्साह तर पाहायला मिळालेला नाहीच पण अनेकांनी जीएसटीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर कोइंबतूर येथेही जीएसटीचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.