मोदी सरकारला राममंदिर बांधण्यासाठी आणखी वेळ दिला पाहिजे, असे मत शुक्रवारी लखनौ येथे सुरू असलेल्या संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या परिषदेत व्यक्त करण्यात आले. लोकसभेवेळी भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यघटनेच्या कक्षेत राहून अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर संघाकडून हे मत व्यक्त करण्यात आले. सध्या लखनौ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय परिषद सुरू असून, त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे सर कार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांनी यासंबंधीची माहिती दिली. अयोध्येतील राममंदिर हा देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मुद्दा असला तरी, त्यासंदर्भात संघाकडून भाजपला विचारणा करण्याची गरज नाही. केंद्र सरकारकडे २०१९ पर्यंतचा अवधी असून, लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे जनतेने याप्रश्नी सरकारला वेळ द्यायला पाहिजे. राममंदिर बांधण्यासाठी संघाने यापूर्वीच धर्माचार्य आणि विश्व हिंदू परिषदेला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून संघ भाजप सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करू इच्छित नाही. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी याबद्दल बोलणे अधिक संयुक्तिक ठरेल, असे होसाबळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या परिषदेसाठी संघ कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रांवरही मंदिरे, अयोध्येतील शरयू नदी आणि रामाची प्रतिमा छापण्यात आली आहे. यावेळी लव्ह जिहादविषयी विचारण्यात आले असता, होसाबळे यांनी लव्ह जिहादचा मुद्दा संघाने दहा वर्षापूर्वीच उपस्थित केल्याचे सांगितले. यावेळच्या परिषदेत सदस्यांकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यास त्याविषयी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.