सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय सशस्त्र दलातील शहीद जवानांच्या मुलांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा विस्तार केला आहे.

नक्षलवादी आणि दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्य पोलिसांच्या मुलांचा शिष्यवृत्ती योजनेत समावेश केला आहे. या योजनेतंर्गत दर महिन्याला देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्येही वाढ केली आहे. मुलांची शिष्यवृत्ती दोन हजारवरुन अडीच हजार आणि मुलींच्या शिष्यवृत्तीत २२५० वरुन तीन हजार रुपये वाढ केली आहे.

राष्ट्रीय संरक्षण निधी अंतर्गत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत बदलांना मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर लगेच पंतप्रधान मोदींनी टि्वट करुन या निर्णयाची माहिती दिली.

गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदीसह ५७ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शुक्रवारी सकाळी राष्ट्रपतींनी नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. मोदींनी शपथविधीसाठी आलेल्या पाच देशांच्या प्रमुखांसोबतही चर्चा केली.

शुक्रवारी दुपारी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालयाची तर निर्मला सीतारमन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यात २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश होता.