माहिती आयोगाची दिल्ली, गुजरात विद्यापीठांना सूचना
केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीसंदर्भात माहिती देण्याची सूचना दिल्ली आणि गुजरात विद्यापीठांना दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्य माहिती आयुक्त आचार्युलू यांना लिहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मोदी यांच्याकडे कोणतीही पदवी नाही, असा काही घटकांचा आरोप आहे, तर मोदींनी १९७८ साली दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि १९८३ साली गुजरात विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली, असे सांगितले जाते. त्या अनुषंगाने हंसराज जैन यांनी माहिती मागवली होती; पण त्यांनी अर्जामध्ये मोदींचे थेट नाव न घेता १९७८ साली एन. आणि एम. या आद्याक्षरांनी सुरू होणाऱ्या नावाच्या विद्यार्थ्यांची माहिती मागवली होती. त्यावर विद्यार्थ्यांचा नेमका क्रमांक माहिती असल्याशिवाय ही माहिती शोधणे जिकिरीचे काम आहे, असे विद्यापीठांनी कळवले होते. या विषयात केजरीवाल यांनी लक्ष घातल्यानंतर माहिती आयोगाने दोन्ही विद्यापीठांना ही माहिती त्वरित शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत, आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला नेमका क्रमांक आदी माहिती विद्यापीठांना देण्याच्या सूचना दिल्या.