समाजवादी पक्षाचे नेते नरेश आगरवाल यांच्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिले. चहा विकणाऱया माणसाला राष्ट्रीय विषयांचा आवाका कसा असेल, अशी टीका आगरवाल यांनी मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली होती. त्याला मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अशा टीकेमुळे मोदींवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट त्यामधून त्यांची मनोवृत्तीच दिसून येते, असे मोदी म्हणाले. लहानपणी आम्ही लोकांचे खिसे कापले नाहीत. तर उदरनिर्वाहासाठी चहा विकला. याची तुम्ही चेष्टा करता आहात का, असा सवालही मोदी यांनी उपस्थित केला.