30 October 2020

News Flash

मोदी यांचे इम्रान यांना दहशतवादमुक्तीचे आवाहन

निवडणुकीनंतरच्या शुभेच्छा संवादात हिंसाचाराला विरोध

निवडणुकीनंतरच्या शुभेच्छा संवादात हिंसाचाराला विरोध

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात निर्माण झालेला तिढा सोडवण्याचा भाग म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून दोन्ही देशांच्या उन्नतीसाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर, या क्षेत्रात शांतता व समृद्धी वाढवण्यासाठी हिंसाचार व दहशतवाद यापासून मुक्त असलेले वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी त्यांना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या भरघोस विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी खान यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विटरचा आधार घेतला होता. यानंतर रविवारी त्यांनी मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. या संवादात, दक्षिण आशियात शांतता, प्रगती आणि समृद्धी ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मोदी यांच्यासोबत काम करण्याची आपण वाट पाहात असल्याचे खान म्हणाले.

या दूरध्वनी संवादात, दोन्ही देशांमध्ये विश्वास उत्पन्न करण्याची, तसेच दक्षिण आशियात शांतता व समृद्धी वर्धिष्णु होण्यासाठी हिंसाचार आणि दहशतवादमुक्त वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता मोदी यांनी व्यक्त  केली.

आपल्या सरकारच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार घेतलेल्या पुढाकाराची आठवण करून देत मोदी यांनी, दोन्ही देशांनी गरिबीचा एकत्रितपणे मुकाबला करण्याबाबत यापूर्वी खान यांना केलेल्या सूचनचे यावेळी स्मरण करून दिले.

जगभरातील नेत्यांकडून अभिनंदन

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या प्रचंड विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान, कतारचे आमिर शेख तामिम बिन हमत अल-थानी, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आणि श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षा यांनी शनिवारी पंतप्रधानांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. याशिवाय मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद आणि नेपाळचे माजी पंतप्रधान माधव नेपाळ यांचाही अभिनंदन करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 1:25 am

Web Title: narendra modi imran khan
Next Stories
1 श्रीलंकेतून १५ दहशतवादी लक्षद्वीपच्या दिशेने रवाना?
2 पक्षहितापेक्षा मुलांच्या भवितव्याची चिंता
3 मोदींचा शपथविधी गुरुवारी संभाव्य मंत्र्यांची नावे गुलदस्त्यात 
Just Now!
X