सभेतील कमी झालेला जोश आणि मागे दिसणारया रिकाम्या खुच्र्या यामुळे गेले काही दिवस चच्रेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूरत येथील सभा मात्र गतकाळाची आठवण करून देणारी ठरली. ओखी वादळामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या सभेसाठी लोक तीन तासांहून अधिक काळ उन्हात ताटकळत मोदींची वाट पाहत होते. मोदींनी भाषण सुरू केले आणि तुडुंब भरलेले मैदान रिते होण्यास सुरूवात झाली.

गुजरातमधील विधानसभा निवडणुकांसाठी मोदी संपूर्ण राज्यात सभा घेत आहेत. मात्र गेल्या काही दिवसात त्यांच्या सभांचा कमी झालेला प्रेक्षकवर्ग चच्रेचा विषय होता. धांदुका, भरूच येथे तर अध्र्याहून अधिक खूच्र्या रिकाम्या राहिल्या होत्या. भाजपचे मुख्यमंत्री उभे असलेल्या राजकोटमध्येही १५ हजार खूच्र्याचे मैदान भरण्यासाठी माणसे आणण्याची वेळ आली होती. सूरतमधील रहिवाशांनी मात्र प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मोदींना दिलासा दिला. सूरतमधील लिंबायत परिसरात बुधवारी संध्याकाळी सहा वाजता मोदी यांची सभा होती. वादळामुळे ती रद्द करावी लागली. मात्र सूरतमध्ये एकतरी सभा हवीच, म्हणून आचारसंहिता संपण्याआधी घाईघाईने गुरुवारी दुपारी एक वाजता सभा ठेवली गेली. गुजराती, उत्तर भारतीय आणि मराठी कनिष्ठ वर्गीयांची मिश्र वस्ती असलेल्या या भागात गुजरातमधील एकमेव मराठी आमदार आहे. घरांनी वेढलेल्या मदानाला दुपारी एक वाजता जत्रेचे रूप आले होते. ज्या मदानात सभा होती, त्याच्या पलिकडच्या मोकळ्या जागेवर  बस, ट्रक, टेम्पो, कार, दुचाकींचा वेढा पडला होता. त्याच बाजूला असलेल्या दुमजली घरांच्या गच्चीत, खिडक्यांमध्ये लोक उभे होते. दुपारी अडीच वाजेपर्यंत मैदान खचाखच भरले. अतिरिक्त खूच्र्या असल्या तरी त्या मांडण्यासाठी जागा नव्हती. दर पाच मिनिटांनी मोदी, मोदी अशी कोणीतरी आरोळी देई आणि सर्व प्रेक्षक उभे राहून, खूच्र्यावर चढून त्या दिशेला पाहू लागत. व्यासपीठावर उत्तर भारतीय नेत्यांची भाषणे ऐकण्याच्या मनस्थितीत कोणी नव्हते.

लहान मुलांना बाहेर पिटाळणे, लोकांना खूर्यावरून खाली उतरायला लावणे, गर्दी आवरणे.. हे सर्व पोलिसांच्या आवाक्याबाहेर जातेय की काय अशी शंका येण्याइतपत स्थिती होती. सुमारे तीन तास हा खेळ सुरू होता. अखेरीस साडेतीन वाजता मोदी येण्याची शक्यता वाटू लागली. पावणेचार वाजता ते आले आणि प्रेक्षकांना आवरताना पोलिसांची पुरेवाट झाली. खूच्र्यावर, बांबूंवर चढून प्रेक्षक, लहान मुले मोदींना पाहण्यासाठी झटापट करत होती. पाच वाजता प्रचार थांबवावा लागणार असल्याने मोदींनी लगेचच भाषण सुरू केले.

गुजरातीतील ते भाषण ऐकून उत्तर भारतीयांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसू लागले आणि दोनच मिनिटांत प्रेक्षक मुख्य दरवाजाकडे वळले. काही मिनिटांपूर्वी आत येण्यासाठी धडपडणारी गर्दी बाहेर जाण्यासाठी एकमेकांना ढकलू लागली. आत येण्यासाठी लावलेले मेटल डिटेक्टर काढून लोकांना वाट करून देण्याची वेळ सुरक्षायंत्रणांवर आली. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत मदानातील अध्र्याअधिक खूच्र्या रिकामी दिसू लागल्या. गुजरात मधील निवडणुका मोदी काय म्हणतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असले तरी आपल्या परिसरात आलेल्या मोदींना पाहणे हाच लोकांचा एक कलमी कार्यक्रम होता