22 September 2019

News Flash

भारत- भूतान आर्थिक, सांस्कृतिक संबंध नव्या उंचीवर नेणार- मोदी

पंतप्रधान मोदी यांना भूतानच्या ताशीछोडझोंग राजवाडय़ात सलामी देऊन जंगी स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भूतानच्या दौऱ्यासाठी येथे आगमन झाले असून त्यांनी त्यांचे समपदस्थ लोटे शेरिंग यांच्याशी शनिवारी चर्चा केली. वेगवेगळ्या क्षेत्रांत द्विपक्षीय भागीदारी वाढवण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली असून यासंबंधात १० सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

दोन्ही देशांच्या संबंधात दृढता आणि विश्वास आणण्याचा यात प्रयत्न असून मोदी यांनी शेरिंग यांच्याशी शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली, अशी माहिती परराष्ट्र प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटर संदेशात दिली. त्यांनी म्हटले आहे, की भूतानमधील जुने धार्मिक केंद्र असलेल्या सिमटोका डोझाँग बरोबर समझोता करार होणार आहे. रुपे कार्डही सुरू करण्यात आले आहे. मोदी यांची ही भूतानला दुसरी भेट असली तरी त्यांच्या दुसऱ्या पर्वातील पहिलीच भेट आहे. पंतप्रधान मोदी यांना भूतानच्या ताशीछोडझोंग राजवाडय़ात सलामी देऊन जंगी स्वागत करण्यात आले. पारो विमानतळावरही त्यांचे शाही स्वागत झाले.

दोन्ही देशांदरम्यान व्यापक चर्चा झाली असून आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध नव्या उंचीवर नेण्यास मोठी संधी असल्याचे मोदी यांनी सांगितले. ते भूतानी विद्यार्थ्यांशी प्रतिष्ठित रॉयल विद्यापीठात संवाद साधणार आहेत.

 

First Published on August 18, 2019 1:31 am

Web Title: narendra modi india bhutan relations