गुजरातमध्ये अल्पसंख्यांक समाज असुरक्षित असल्याच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याला आवाहन देण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात फेसबुक प्रकरणी झालेल्या अटकेचा आधार घेतला आहे.
महाराष्ट्रात जिथे तुमची सत्ता आहे, तिथे शाहीन धाडा नावाच्या मुलीला फेसबुकवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात अटक करण्यात आली, असं ते सुरत येथील प्रचार सभेत बोलताना म्हणाले. पोलिस कोठडीतून बाहेर आल्यावर ती मुलगी म्हणाली, ‘माझं कुटुंब महाराष्ट्रात राहणार नाही आणि आम्ही गुजरात हे सुरक्षित ठिकाण असल्या कारणाने तेथे स्थलांतरीत होणार आहोत’.     
नरेंद्र मोदी यांनी येथे आसामचाही दाखला देत अहमद पटेल आणि सोनिया गांधी यांची नक्कल केली. मोदी यांनी पटेल यांचे वर्णन अहमदमीया असे केले, आणि नंतर त्यांच्यावर हल्ला चढवतच म्हणाले की, गुजरातला सुलतानाची आवश्यकता नाही. रविवारी मोदी म्हणाले, अहमदमीया, उर्फ अहमदभाई, उर्फ बाबूलभाई – तुम्हाला किती टोपणनावे आहेत. खरी गोष्ट तर ही आहे की तुम्ही जे शब्द वापराल ते कळायला हवेत, सुलतानचा जन्म साम्राज्यात झाला होता. पंतप्रधानाची मुलगी त्यांच्यानंतर देशाची पंतप्रधान होते, नंतर त्यांचा मुलगा ती जागा घेतो. तुम्ही तुमचे आयुष्य सुलतानाची सेवा करण्यात घालवले आहे, त्यामुळे तुम्हाला सुलतान या शब्दाशिवाय दुसरा कोणताही शब्द सुचत नाही.
सोनिया गांधींबदद्ल  मोदी म्हणाले की, ‘सोनियाबेन असं म्हणाल्य़ा की गुजरातचा विकास झालेला नाही’. सोनियाबेन तुम्ही पवी जेतपूरला या. तिथे आदिवासी लोकांना त्यांच्या घरात वीज आहे का ते विचारा. आमच्या गुजरातमध्ये आदिवासी लोकांच्या घरात चोवीस तास वीजपुरवठा होतो. तर, दिल्लीमध्ये, तुमच्या घरातही तुम्हाला जनरेटर ठेवावा लागतो. एवढंच नव्हे तर, पंतप्रधानांच्या घरातही जनरेटरचा वापर करावा लागते, असंही मोदी म्हणाले.