पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे मुकेश अंबानी आणि अदाणी यांचे लाऊडस्पीकर आहेत अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. हरयाणा येथे झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते. सध्या देशाची अर्थव्यवस्था बघा, आणखी सहा महिन्यांनी देशात बेरोजगारीचा प्रश्नही निर्माण होणार आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनोहरलाल खट्टर यांची भाषणं ऐकली तर खोटी आश्वासनंच ऐकायला मिळतात असंही त्यांनी म्हटलं आहे.

हरयाणात किती लोकांना रोजगार मिळाला? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला. टाटांची फॅक्टरी का बंद पडली? लोकांच्या नोकऱ्या जात आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत, खोटी आश्वासनं देत आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. भाजपासोबत आमची लढाई ही विचारधारांची लढाई आहे. या देशात विविध धर्मांची, जातीची माणसं राहतात. मात्र भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश तोडण्याचं काम करत आहेत. दोन व्यक्तींमध्ये भांडणं लावणं, तेढ निर्माण करणं हे संघ आणि भाजपा करत आहेत असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.

सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची दाणादाण उडाली आहे. याचं कारण हेच आहे की मोदी हे अंबानी, अदाणी यांचे लाऊडस्पीकर आहेत. सध्या देशातल्या सगळ्या राज्यांमधल्या लघू आणि मध्यम व्यावसायिकांचं कंबरडं मोडलं. नोटबंदी झाली तेव्हा लोक नोटा बदलून घेण्यासाठी लोक रांगेत उभे होते. अंबानी, अदाणी हे उभे होते का? असाही प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. त्यानंतर जीएसटी लावून तुमची उरलीसुरली पुंजीही लुटली असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. जीएसटीमुळे एकाही सामान्य माणसाला फायदा झाला नाही उलट तोटा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या निवडक १० ते १५ व्यावसायिकांचं भलं केलं असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.